केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेत नसलेल्या काँग्रेसने शहरात २० हजार सक्रिय सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देवडिया काँग्रेस भवनात आज सदस्यता नोंदणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली.
शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात दोन हजार बुथ असून, प्रत्येक बुथवर १० सक्रिय सदस्य देण्याची भूमिका शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी मांडली. काँग्रेसची सदस्य मोहीम १५ मे रोजी संपणार आहे. या मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अ‍ॅड. अभिजित वंजारी, गजानन हटेवार उपस्थित होते. पक्ष सत्तेत नसताना कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. शहराध्यक्ष नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याच्या प्रयत्नात आहे. सदस्यता मोहीम संपल्यानंतर शहराध्यक्ष निवडला जाणार आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडे पक्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा अनेकांनी धसका घेतला आहे. सत्तेत नसताना काँग्रेसला सदस्यता मोहीम राबविणे पहिल्यासारखे सोपे काम राहिलेले नाही.
यासाठी पक्षाचे धोरण, मोदी सरकारचे अपयश आणि राहुल गांधी यांनी अलीकडे घेतलेली भूमिका यावर भर देत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळेक मात्र उपस्थित नव्हते. याविषयी बोलताना त्यांनी युवक काँग्रेसतर्फे सुगतनगर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने बैठकीला उपस्थित राहता आले नाही, असे सांगितले.