जाहिरातीच्या माध्यमातून अल्पप्रमाणात उत्पन्नाचे साधन नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन (एनएमएमटी) विभागाला मिळाले आहे. जाहिरातीसाठी कायपण अशी भूमिका असलेल्या परिवहन बसवर झळकणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमदेवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचार बॅनरने परिवहन विभाग अडचणीत आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरातीसाठी कंत्राट देण्यात आल्याने याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे सांगत परिवहन विभागाने हात वर केले आहेत. परिवहनच्या बसवर आघाडीचे उमेदवार नार्वेकर यांचा प्रचार करणारे बॅनर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या प्रकरणी इतर उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर खांदेश्वर पोलिसांकडून यावर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अशा पद्घतीने उमेदवारांचे प्रचार करणारे बॅनर्स लावण्यास परिवहन विभागाने परवानगी देणे योग्य नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने दबावाखाली हे बॅनर्स लावण्याची मूक संमती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे बॅनर्स लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अडचणीत येत असल्याचे पाहता परिवहन अधिकाऱ्यांनी हात वर केल्याने हे प्रकरण जाहिरात घेतलेल्या कंत्राटदारावर शेकणार असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, बसवर राहुल नार्वेकर यांची जाहिरात होती. जाहिरातीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.