उरण तालुक्यातील शिवसेना -भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निकाल सुरवातीपासूनच आघाडी घेतलेल्याने मोदी सरकार येणार याचा आनंद व्यक्त करीत शहरातील नाक्या-नाक्यावर जोरदार फटाक्यांची आतषबाजी करीत व पेढे आणि लाडू वाटून आनंद साजरी केला.
शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे उरण परिसरात नागरीकांची दिनचर्या सुरू झाली असली तरी प्रत्येकाच्या मनात आज लोकसभेच्या निवडणूकांचा निकाल आहे,तो काय लागणार याची उत्सुकता होती. सर्वसामान्य जनतेची मात्र आपल्या जगण्याची धडपड सुरू होती.सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. उरण शहरातील शिवसेना कार्यालयात हळूहळू कार्यकर्ते जमू लागले निकाल पाहण्यासाठी कार्यालयातील टि.व्ही.सुरू असल्याची खात्री करून घेतली.
आपल्या उमेदवाराची आघाडी जनतेला कळावी याकरीता कार्यालया बाहेर फलक लावण्यात आला होता. या फलकावर मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे मताधिक्य लिहले जात होते.  बहूतांशी कार्यकर्तांनी  मात्र आपल्याच घरातील टि.व्हि.वर आपल्या मतदार संघाचा काय निकाल लागतो हे पाहणे पसंद केले. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात शुकशुकाट होता.एक दोन कार्यकर्ते टि.व्हि.वर निकाल पाहत बसलेले होते.
मात्र त्याही पेक्षा विदारक चित्र हे काँग्रेसच्या कार्यालयात दिसत होते. कार्यालयाचे शटर उघडे असले तरी कार्यालयात कोणीही नव्हते तर जसजसे काँग्रेसच्या विरोधात निकाल येऊ लागले त्यानंतर कार्यालयाचे शटरही बंद करण्यात आले होते.
निकालाच्या दरम्यान कधी शेकापचे लक्ष्मण जगताप तर कधी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे आलटून पालटून आघाडीवर असल्याच्या बातम्या येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती.मात्र बारणे यांनी २५ हजारांची आघाडी घेतली त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत उरण शहरातून मिरवणूक काढून आनंदोत्सवही साजरा केला.