‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमामुळे देशभर प्रसिद्धी पावून केंद्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील ज्या दाभडी येथे शेतकऱ्यांना आश्वासनांच्या पावसाने ओलेचिंब केले होते त्या आश्वासनांचा फुगा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने २० मार्चला त्या दाभडीतच एका भव्य सभेचे आयोजन केले आहे. मोदी यांच्या आश्वासनांची किती पूर्तता झाली, या विषयावर शेतकऱ्यांशी काँग्रेस नेते चर्चा करून मोदींच्या आश्वासनाचा फुगा फोडणार आहेत.
माजी सामाजिक न्यायमंत्री व काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी येथे आयोजित वार्ताहर परिषदेत या संदर्भात माहिती देताना सांगितले की, लोकसभा निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांनी १२ फेब्रुवारी २०१४ ला अहमदाबाद येथे उत्तम शासन (गुड गव्हर्नन्स), ८ मार्च २०१४ ला दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा आणि सबलीकरण व २० मार्च २०१४ ला आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकरी संवाद, असे देशभरात ३ ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केले होते. दाभडीचा कार्यक्रम देशभरात सॅटेलाईटव्दारे ५०० शहरात १४ हजार ठिकाणी ‘लाईव्ह’ दाखवला होता. आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असा हमी भाव देऊ, असे आश्वासन मोदी यांनी दिले होते. त्यांच्याच सरकारने कापसाचा उत्पादन खर्च ६ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ, कापसाला ९ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. मात्र, मोदींनी आश्वासनाची पूर्ती तर सोडाच त्या दिशेने कोणतेही प्रयत्न चालवले नाहीत. लोकांची दिशाभूल करून सत्ता मिळवणाऱ्या मोदींचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगळे आहेत, हे २० मार्चला दाभडीत आयोजित प्रचंड सभेत उघड होणार आहेत.
या दिवशी मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. २० मार्चला मोदी भेटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दाभडी येथे गावकऱ्यांच्या मोदी सरकारबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मोघे यांनी सांगितले. यावेळी आर्णीचे नगराध्यक्ष आरीज बेग म्हणाले, मोदींनी जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली, पण आता आपली फसवणूक झाल्याची जनभावना तीव्र असून मोदी सरकारला जनताच धडा शिकवेल.
‘जेथे फुले वेचली तेथे आता गोवऱ्या..’
नरेंद्र मोदी यांनी दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेऊन ‘स्तुतींची फुले वेचली’, पण आता आपली फसगत झाल्याची जाणीव जनतेला झाली आहे. याच दाभडीत शुक्रवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोदींना ‘निषेधाच्या गोवऱ्या’ वेचण्याची पाळी येणार आहे. ‘जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचल्या’ ही म्हण सार्थ झाल्याचा अनुभव मोदींपर्यंत पोहोचविला जाणार असल्याचेही मोघे यांनी सांगितले. तीन ठिकाणच्या ‘चाय पे चर्चा’ने आणि या कार्यक्रमावर भाजपने केलेल्या अब्जावधी रुपयांच्या खर्चाने मोदींनी प्रसिध्दी आणि सत्ता मिळवली, पण एकाही ठिकाणच्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे दिसत नसल्याचा आरोप मोघे यांनी केली.    
राज्य शासनाने दाभडीला दत्तक घेतले!
आर्णी तालुक्यातील दाभडी या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाला राज्य शासनाने दत्तक घेतल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत चर्चा करतांना दिली. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्याबाबत त्यांनी या घोषणेला दुजोरा दिल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत आर्णी तालुक्यात २०० वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून एकटय़ा दाभडीत ९ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत.