ऑरेज सिटी वॉटर वर्क्‍सतर्फे नागरिकांना दिली जाणारी पाण्याची वाढीव बिले आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार बघता त्यांचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी करीत काँग्रेसने सिव्हील लाईनमधील महापालिकेच्या कार्यालयात महापौरांना घेराव घातला. यावेळी ओसीडब्ल्यूच्या विरोधात घोषणा देत त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यात आला.
शहरात चोवीस तास पाणी देऊ, अशी घोषणा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या (ओसीडब्ल्यू) अनागोंदी कारभाराबद्दल काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून रोखठोक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सदस्यांनी ओसीडब्ल्यूच्या विरोधात महापौर प्रवीण दटके यांना घेराव करून त्यांना ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी केली. यावेळी महापौराच्या कक्षामध्ये माठ फोडून निषेध करण्यात आला.
यावेळी विकास ठाकरे म्हणाले, ओसीडब्ल्यूचे कर्मचारी जनतेला लुटत आहे. एका प्रकरणात सुरुवातीला जास्त रक्कम असलेले देयक पाठविण्यात आले. त्यानंतर एकत्रित रकमेचे देयक पाठविण्याचा धाक दाखवून ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्याने पाच ते दहा हजारांची मागणी करीत आहे. जुने मीटर ऐवजी नवीन मीटर बसविण्याचा सल्ला देत आहेत. लोकांची अशा पद्धतीने लूट केली जात असल्याबद्दल ठाकरे यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांवर आणि ‘ओसीडब्ल्यू’वर कारवाई करावी, अशी मागणी केली. शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. मात्र, ते बुजविण्यात आले नाही.
अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची गळती सुरू आहे. ओसीडब्ल्यूच्या कार्यालयात गेले तर कर्मचारी आणि अधिकारी सामान्य नागरिकांना बरोबर उत्तरे देत नाही. शहरात त्यांची मक्तेदारी असल्यासारखे ते वागत आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई असताना टँकरची मागणी केली जाते. मात्र, टँकरसाठी पैसे आकारले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पाण्याची जोडणी करण्यासाठी नागरिकांकडून पैसे आकारले जात असल्यामुळे ओसीडब्ल्यूचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यावेळी प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, अरुण डवरे यांच्यासह सेवादल, युवक काँग्रेस, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला देण्यात आलेले पाणी पुरवठय़ाचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर येऊन काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.