पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात जाऊन स्वतच्या देशाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यावरून समाज माध्यमातून टीकाचा सूर उमटला असताना काँग्रेसनेही मोदींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
 ‘भारत जन्म दुर्लभ:’ या सुभाषितातून भारताच्या महान संस्कृतीची गाथा सांगण्यात आली आहे. यातून भारतात जन्म होणे हे दुर्लभ व भाग्याचे आहे, असा संदेश देण्यात आला आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी विदेशात असताना आपल्या देशाविषयी अनुद्गार काढतात. ही लाजीरवाणी बाब आहे. मोदींनी चीन व दक्षिण कोरियात भारत आण भारतीयांचा अपमान करणारे उद्गार काढले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘वर्षभरापूर्वी, मी पंतप्रधान होण्यापूर्वी, लोकांना आपण भारतीय आहोत हे सांगण्याची लाज वाटत होती. मागच्या जन्मात आपण कोणते पाप केले होते की, ज्यामुळे आपण भारतात जन्माला आलो अशी भावना लोकांमध्ये होती, हा काय देश आहे, हे काय लोक आहेत असे भारतीयांना वाटत होते.’ अशा शब्दात देशाची व देशवासीयांचा अवमान करणारे उद्गार मोदींनी काढले.
मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी या देशात अनेक थोर महापुरुष व महान राजे होऊन गेलेत. त्या सर्वाना तुच्छ लेखतानांच भगवान राम व श्रीकृष्ण यांच्यापेक्षाही मोदी स्वतला महान समजत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. विदेशात असताना देशाचा व देशवासीयांचा अपमान करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याची भारतीयांनाच लाज वाटत आहे. समाज माध्यम व जनतेत होत असलेल्या चर्चेवरून ही बाब दिसून आल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या देशात भगवान राम, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती शाहू महाराज व अनेक महान राजे होऊन गेलेत. त्यांच्या राज्यात जनता सुखी होती. परंतु भारताची महान संस्कृती, परंपरा व इतिहास या सर्वाना पायदळी तुडविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी या राजांशिवाय देशात एकेकाळी असणाऱ्या ‘राम राज्य’ पेक्षाही आपले राज्य चांगले असल्याचा भ्रम व अहंकार त्यांना झाला आहे.
‘प्रासाद शिखरोस्तोपी काक गरुडायते’ अर्थात ‘कावळा मंदिराच्या कळसावर जाऊन बसला तरीही तो गरुड होऊ शकत नाही’. अशा आशयाच्या संस्कृत सुभाषिताची प्रचिती पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यातून आली आहे, असे टीकास्त्र डॉ. ढोणे यांनी सोडले आहे.