पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उपराजधानीत कस्तुरचंद पार्कमध्ये उद्या, गुरुवारी मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पारडी उड्डाण पुलाच्या भूमिपूजन सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये तर काहींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहत असतील तर जाऊ, अशी भूमिका घेतल्यामुळे कार्यकत्यार्ंमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सध्या मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पारडी उड्डाण पूल या प्रकल्पांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेय घेण्याचे राजकारण सुरू असताना प्रशासनाने मात्र कार्यक्रमाचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. शासकीय कार्यक्रम असला तरी भाजपने या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे जय्यत तयारी सुरू केली आहे. वस्त्या वस्त्यांमध्ये कार्यक्रमाचे पत्रक वाटले जात आहे.
लाखोंच्या संख्येने लोकांनी जाहीर सभेला उपस्थित राहावे म्हणून विदर्भातून लोक आणण्यासाठी गाडय़ांची व्यवस्था केली आहे. शहरातील विविध भागात पोस्टर्स लावले जात असून त्यात काँग्रेसच्या एकाही नेत्यांचे छायाचित्र नाही. पत्रकांमध्ये सुद्धा भाजप नेत्यांचा नावाचा उल्लेख आहे त्यामुळे भाजपने हा कार्यक्रम हायजॅक करण्याची पूर्ण तयारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी याबाबत काही बोलायला तयार नाही. भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून ते दुर्लक्ष करीत आहेत. देवडिया भवनात फेरफटका मारला असता काहीं पदाधिकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलू लागले आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकत्यार्ंचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नागपूरला असताना त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही त्यामुळे उद्या, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिस अहमद यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री जात असतील तर आम्ही जाऊ अन्यथा आमचा कार्यक्रमावर बहिष्कार राहणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव काँग्रेसच्या काळात राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला असताना त्याचे श्रेय मात्र भाजप घेत असल्याचे ठाकरे म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित राहावे की नाही याबाबत पक्षाकडून कुठलेही आदेश आले नसल्याचे ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपुरात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ कस्तुरचंद पार्क मैदानात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. केंद्रात काँग्रेस सरकार असताना काँग्रेसने कार्यक्रम हायजॅक केला. त्यावेळी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांची नाराजी असल्यामुळे शरद पवार कार्यक्रमाला आले नव्हते. मात्र, पक्षाचे काही नेते उपस्थित होते. तो कार्यक्रम शासनाचा होता तरी काँग्रेसने त्याला जाहीर सभेचे स्वरूप दिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे उद्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतात का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.