धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासावरून राजकारण पेटले
* सिडकोच्या पुढाकारासाठी काँग्रेसचे प्रयत्न
* पडद्याआडून हालचालींना वेग
* राष्ट्रवादीपुढील अडचणीत वाढ

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी महापालिकेच्या माध्यमातून अडीच चटईक्षेत्र निर्देशांक पदरात पडावा, यासाठी राज्य सरकारकडे प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा देण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून ही पुनर्बाधणी सिडकोमार्फत केली जावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना गळ घालण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न राजकीय स्तरावर गेल्या अनेक वर्षांपासून चघळला जात आहे. सिडकोचे बांधकाम अल्पावधीतच धोकादायक ठरल्यामुळे या इमारतींमध्ये राहणारे रहिवाशी पुन्हा एकदा आपल्या इमारती सिडकोकडे सोपविण्याच्या मन:स्थितीत नाहीत. असे असताना सिडकोमार्फत पुनर्बाधणीचा प्रस्ताव हाती घेतला जावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे राजकीय दबाव वाढवून राष्ट्रवादीवर निशाणा चालविण्याची खेळी काँग्रेसच्या गोटातून खेळली जाऊ लागली आहे. या राजकीय स्पर्धेत पुनर्विकासाचा प्रश्न आणखी बराच काळ रखडेल, अशी भीती रहिवाशी व्यक्त करत आहेत.
नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सिडकोने उभारलेल्या इमारतींमधून लाखोंच्या संख्येने रहिवाशांचे वास्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील सर्वेसर्वा गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व या वसाहतींमध्ये दिसून येते. अल्पावधीत निकृष्ट बांधकामाचा नमुना ठरलेल्या या इमारतींची पुनर्बाधणी केली जाईल, असे आश्वासन देत गणेश नाईक यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये या वसाहतींमधील मताधिक्याच्या जोरावर विजय संपादन केला आहे. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. असे असताना महापालिकेकडून राज्य सरकारकडे पुनर्बाधणीसंबंधी प्रस्ताव पाठविताना वेळकाढू धोरण अवलंबिले गेल्यामुळे सिडको वसाहतीमधील रहिवाशी सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुनर्बाधणीसाठी अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाच्या प्रस्तावास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला नाही, तर त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल, अशी चिन्हे दिसत आहेत. या पाश्र्वभूमीवर सिडकोच्या निकृष्ट इमारतींची पुनर्बाधणी पुन्हा सिडकोमार्फत केली जावी, अशी भूमिका घेण्यास काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून त्यामुळे राष्ट्रवादीपुढील अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अडीच चटईक्षेत्र प्रलंबित
निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीचा प्रश्न राज्याच्या विधिमंडळात यापूर्वी अनेक वेळा चर्चेला आला आहे. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाधणीसाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करू, असे आश्वासनही दिले आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव उशिरा का होईना राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून त्यावर विचार सुरू आहे. सिडको इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच चटईक्षेत्र देण्याचा महापालिकेच्या प्रस्तावास
सिडकोने मात्र विरोध केला आहे. हा एफएसआय दोनपर्यंत मर्यादित असावा, असे सिडकोचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेचा मूळ प्रस्ताव एकीकडे वादात सापडला असताना काँग्रेसच्या काही
नेत्यांनी पुनर्बाधणीसाठी सिडकोने पुढाकार घ्यावा, असा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडी झाली आहे.
नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत काँग्रेसचे संतोष शेट्टी यांनी धोकादायक इमारतींची पुनर्बाधणी सिडकोमार्फत केली जावी, असा सूर व्यक्त केला. काँग्रेसचे काही स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी पुढे रेटण्याच्या तयारीत आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीत खासगी विकासकांना स्थान दिले गेल्यास रहिवाशांची फसवणूक होण्याची भीती आहे. त्यामुळे सिडकोने पुनर्विकास करावा, असे काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. यासंबंधी पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली तरी राष्ट्रवादीच्या व्होटबँकेला संभ्रमात टाकण्याची ही खेळी असल्याची चर्चा आता रंगली आहे.