सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असतानाच्या काळात विदर्भातील एका खाजगी संस्थेकडून भाजपने राज्यभरात केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात काँग्रेसला सर्वाधिक ६५ च्या आसपास, भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या ६० तर शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाच्या ५० ते ५५ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४०-४५ जागा मिळवून चवथ्या स्थानी फेकला जाण्याची शक्यता गृहित धरण्यात आली असून राज ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली मनसेला किमान २२ ते २८ जागांवर विजय मिळेल, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे.
सर्वेक्षणातील अंदाज प्रत्यक्षात खरे उतरल्यास भाजप-शिवसेना-आठवले युतीला सत्तेवर येण्यासाठी मनसेची मदत घेणे अपरिहार्य ठरणार आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी महायुतीत मनसेला निमंत्रण देण्याच्या रामदास आठवलेंच्या भूमिकेवर टीका केली असतानाच सर्वेक्षणाच्या निकषाने शिवसेना दिशा बदलणार का, याची चाचपणी केली जात आहे.  एका वरिष्ठ भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार चालू वर्षांच्या प्रारंभीच हे सर्वेक्षण करण्यात आले. विदर्भातील एका संस्थेला सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले होते. या संस्थेचे नाव जाहीर करण्यास त्याने नकार दिला. सर्वेक्षणातील दावे पडताळून पाहिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेना-आठवले गटाच्या महायुतीला राज ठाकरे आणि अपक्षांची साथ घेणे अनिवार्य ठरणार असल्याची वस्तुस्थिती त्याने मान्य केली.
मनसेच्या प्रभावक्षेत्रात शिवसेनेची पारंपरिक मते मोठय़ा प्रमाणात विभाजित होणार असून सत्ताधारी आघाडय़ांबाबत असलेल्या नाराजीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वेक्षणाचा कालखंड आणि पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक पाहता राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही या नेत्याने वर्तविली. यापूर्वी २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ८२ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने ६२ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले होते.
भाजपला ४६, सेनेला ४४, मनसेला १३ तर शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी ४ जागा मिळाल्या होत्या. नितीन गडकरींचा प्रभाव असलेल्या विदर्भात भाजपने १९ जागांवर झेंडा रोवला होता. ही आकडेवारी वाढून २८ पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या प्रभावक्षेत्रात मराठवाडय़ात सध्याच्या दोन जागांवरून जास्तीत जास्त सहा जागा मिळण्याची शक्यता असून कोकणात भाजपला पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईत भाजपला मोठे यश मिळू शकेल, असेही सर्वेक्षणात म्हटले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ तर शिवसेनेने १६९ जागांवर उमेदवार उभे केले होते.