News Flash

दोन्ही काँग्रेसची आघाडीकडे वाटचाल

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करूनच महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांमध्ये आज, गुरुवारी रात्री उशिरा पुण्यामध्ये बैठक झाल्याचे

| November 15, 2013 02:00 am

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करूनच महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांमध्ये आज, गुरुवारी रात्री उशिरा पुण्यामध्ये बैठक झाल्याचे समजले. आघाडीच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांतील ही पहिलीच बैठक होती. दोन्ही पक्षांची भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठी ही प्राथमिक बैठक होत असल्याचे दोन्ही काँग्रेसमधील सूत्रांनी सायंकाळी बैठकीपूर्वी सांगितले.
पुण्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले तर काँग्रेसच्या वतीने जिल्हा प्रभारी आमदार शरद रणपिसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे सहभागी झाले होते. रात्री उशिरा सुरू झालेल्या या बैठकीचा तपशील समजू शकला नाही. मात्र अशी बैठक होत असल्याला दोन्ही पक्षांकडून दुजोरा मिळाला.
सुरुवातीला दोन्ही काँग्रेसने मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला होता. नंतर प्रतिष्ठा राखूनच आघाडी केली जाईल, अशी भाषा सुरू झाली होती, आता प्रत्यक्ष आघाडी होण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ३० तर राष्ट्रवादीने ३५ जागा लढवल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत बोलताना नगरसह धुळ्याची मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्र्वभूमीवर निरीक्षक काकडे यांनी आमदार जगताप यांच्यासह मुंबईत प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव व पालकमंत्री मधुकर पिचड यांची भेट घेतली, तेथेही आघाडीसाठी अनुकूलता दाखवली गेली. आज दुपारी काँग्रेसच्या प्रदेशच्या पदाधिका-यांनीही स्थानिक पातळीवर आघाडीसाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव काय आहे, याची माहिती करून घेण्यासासाठी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निवड समितीबद्दल नाराजी व्यक्त झाली होती. निवडणुकीबाबत पक्षाच्या श्रेष्ठींनी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाकडे अधिकार दिले असल्याचे स्पष्टीकरण एका जबाबदार पदाधिका-याने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पक्षनिरीक्षक काकडे यांच्या उपस्थितीत स्पष्ट केल्याकडेही या पदाधिका-याने लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:00 am

Web Title: congress will keep alliance with ncp
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 सहाशे शाळांना शैक्षणिक सॉफ्टवेअर
2 कोपरगाव पाणी योजनेसाठी माझेच प्रयत्न- खा. वाकचौरे
3 वकिलांवरील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी
Just Now!
X