देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत १५ वेळा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या १५ पैकी १३ वेळा रामटेक मतदरासंघातील मतदारांनी काँग्रेसलाच ‘हात’ दिला असल्याचे इतिहासावर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळेच की काय या मतदार संघाला काँग्रेसचा बालेकिल्ला हे नामाभिदान लागले असावे. परंतु गेल्या काही निवडणुकांपासून काँग्रेसच्या मतात होत असलेली घट मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चिंतेत टाकणारी बाब ठरत आहेत तर दुसरीकडे विरोधकांच्या आत्मविश्वासात वाढ निर्माण करणारी ठरत आहे.
देशाला पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणूनही रामटेकची ओळख आहे. तसेच देशात सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा विक्रमही याच मतदारसंघाने केला आहे. १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जतीराम बर्वे यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवले होते. आणीबाणीनंतर देशात सर्वत्र काँग्रेसविरोधी लाट असताना रामटेकने मात्र इंदिरा गांधी यांनाच साथ दिली होती.
लोकसभेच्या १६ व्या सार्वत्रिक निवडणुकीत आता कोण विजयी होणार याची उत्कंठा लागली असून ती १६ मे रोजीच संपणार आहे. १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे के.जी. देशमुख, १९६२ मध्ये काँग्रेसचे एम.बी. पाटील, १९६७ व १९७१ मध्ये काँग्रेसचे ए.जी. सोनार, १९७७ न १९८० मध्ये काँग्रेसचे जतीरामजी बर्वे तर १९८४ व १९८९ मध्ये पी.व्ही. नरसिंहराव निवडून आले.
२१ मे १९९१ रोजी पंतप्रधान राजीव गांधी याची हत्या झाली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ते आंध्र प्रदेशातील नंदयाल मतदारसंघातून निवडून आले होते. १९९१ मध्ये काँग्रेसचे तेजसिंहराव भोसले, १९९६ मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे, १९९८ मध्ये काँग्रेसच्या चित्रलेखा भोसले निवडून आल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सुबोध मोहिते यांनी रामटेकवर भगवा झेंडा फडकवला. यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवून शिवसेनेचे मोहिते यांना पुन्हा दिल्लीला पाठवले. २००७ मध्ये मात्र त्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसचा ‘हात’ धरला. मोहिते यांच्याविरोधात प्रचार करण्यात आला. यानंतर सेनेचे प्रकाश जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढणाऱ्या मोहितेंचा पराभव केला. नंतर मात्र २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हा काँग्रेसने मुकुल वासनिक यांना पाठवले. यावेळी त्यांच्यावर बुलढाण्याचे पार्सल असल्याची टीका झाली. त्यांनी शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचा केवळ १६ हजार ७०१ मतांनी पराभव केला. आता २०१४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत वासनिक आणि तुमाने आमोरासामोर उभे ठाकले आहेत.
गेल्या पाच वर्षांत काँग्रेसने अनेक लोकहितार्थ योजना राबवल्या त्यामुळे आपला विजय होईल, असा विश्वास मुकुल वासनिक व्यक्त करीत आहेत. तर काँग्रेसविरोधी लाटेचा परिणाम आपल्या विजयात होईल, असा विश्वास तुमाने यांना वाटत आहे. देशाचे लक्ष लागलेल्या या मतदार संघात बसपतर्फे किरण पाटणकर आणि आपतर्फे प्रताप गोस्वामीही रिंगणात आहेत.
हे दोन्ही उमेदवार आपापल्यापरीने प्रचार करत आहेत. गेल्या निवडणुकीत बसपचे प्रकाश टेंभूर्णे यांनी ६० हजार मते घेतली होती. तर बरिएमंचच्या सुलेखा कुंभारे यांनी ४० हजार मते घेतली होती. टेंभूर्णे हे काँग्रेसवासी झाले आहेत तर कुंभारे यांनी वासनिकांना पाठिंबा दिला आहे.
यामुळे वासनिकांना त्याचा लाभ मिळेल, असे बोलले जात आहे. परंतु बसप मात्र हे गणित मानावयास तयार नाहीत. सध्या हा जिंकेल, तो जिंकेल अशी फक्त चर्चा आहे. या मतदारसंघातील १६ लाख ४३ हजार १९७ उमेदवार कुणाच्या भाग्याचा फैसला करतात, हे थोडय़ाच दिवसात स्पष्ट होणार आहे.