लोकसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसने विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदरसंघासाठी तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. नोंदणी झालेल्या मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याची व सुटलेल्यांची नोंदणी करून घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर समितीने सोपवली आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. बबन तायवाडे यांना समर्थन दिले होते. यावेळी मात्र काँग्रेस स्वत: ही निवडणूक लढवणार आहे. भाजपने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. लोकसभा निवडणूक निकालानंतर उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यावेळी नितीन गडकरी लोकसभा लढले. त्यामुळे त्यांच्या जागी आता नवा उमेदवार येणार आहे. अशा परिस्थतीत ही जागा जिंकायची असा काँग्रेसचा निश्चय आहे. बैठकीत रोहयो मंत्री नितीन राऊत, आमदार दीनानाथ पडोळे, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जयप्रकाश गुप्ता, शेख हुसैन, माजी आमदार यादवराव देवगडे, दीपक कापसे, गिरीश पांडव यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व सहा जिल्ह्य़ातील पदाधिकारी हजर होते. निवडणूक विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या मतदार सिडीच्या प्रती कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आल्या. आपल्या मतदारांची नावे व मतदान केंद्र याची माहिती आताच या सिडीत शोधा व त्रुटी असल्यास त्वरित निवडणूक विभागाशी संपर्क साधा, अशा सूचना कार्यकर्त्यांना बैठकीत देण्यात आल्या. मतदार नोंदणीची मोहीम राबवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.