लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय चांगलाच गाजला. परंतु हा विषय काही आजचा नाही. अनेक वर्षांपासून गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि दुरुस्ती याविषयी इतिहासप्रेमी आवाज उठवत असूनही त्याकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षच होत आहे. विरोधकांकडूनही या विषयावर पाठपुराव्याची भूमिका घेतली जात नाही. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या उदासीनतेमुळेच बागलाण तालुक्यातील गड-किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गड-किल्ले असलेला तालुका म्हणून बागलाणचा उल्लेख केला जातो. तालुक्यातील साल्हेर-मुल्हेरसह अनेक किल्ल्यांना शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे इतिहासप्रेमींच्या लेखी असलेले महत्त्व ध्यानात येईल. युवा पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासातून स्फूर्ती मिळावी म्हणून गड-किल्ले सुरक्षित ठेवणे आवश्यक झाले असताना त्यांची पडझड रोखण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करण्यात येत नाही.
मुल्हेर किल्ल्यावर तर शिवकालीन तोफा कुठेही पडलेल्या आढळतात. या किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती मिळण्याची व्यवस्थाही नसते. ढासळणाऱ्या वाटांमुळे किल्ल्यांवर जाणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
साल्हेर-मुल्हेर या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात पूर्वी घनदाट जंगल होते. परंतु सर्रास होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगल दिवसेंदिवस कमी होत गेले. किल्ल्यावरही वनराई फुलविण्याची गरज आहे. वनराई निर्माण झाल्यास किल्ल्याच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
साल्हेरवरील बैठकीच्या वास्तूचीही पडझड झाली आहे. साल्हेर-मुल्हेर या प्रसिद्ध गडकिल्ल्यांची अशी अवस्था असेल तर, इतर गडकिल्ल्यांची स्थिती कशी असेल हे लक्षात येऊ शकेल. तालुक्यातील इतिहासाचा हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.