पालकांनी मराठी माध्यमाकडे पाठ फिरविल्याने मुंबईत मराठी शाळा बंद पडत असल्याचा आरोप कांदिवलीच्या डहाणूवाडी येथील ‘बालक विहार’ या जुन्या शाळेबाबत मात्र कांगावा ठरतो आहे. कारण, येथील संस्थाचालकांनीच ही ४० वर्षे जुनी मराठी शाळा बंद करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे, एकेकाळी १२००हून अधिक असलेली येथील विद्यार्थी संख्या रोडावत २५२ वर आली आहे. या उरल्यासुरल्या विद्यार्थ्यांनीही प्रवेश रद्द करावे यासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने संस्थाचालक आपल्यावर दबाब आणत असल्याची तक्रार पालक करीत आहेत.
आर्थिक गैरव्यवहार, शिक्षकांच्या वेतनाची बिले शिक्षण विभागाकडे सादर करताना केलेल्या अफरातफरी, शिक्षकांना अपमानास्पद वागणूक आदी तक्रारींमुळे ‘डॉ. राममनोहर लोहिया शिक्षण संस्था’चलित ही शाळा सतत चर्चेत असते. शाळेच्या मुख्याध्यापकाने २०१३-१४ मध्ये बोगस शिक्षक दाखवून राज्य सरकारला वेतन अनुदानाच्या नावाखाली लाखो रुपयांचा कसा गंडा घातला होता, याबद्दलचे वृत्त ‘लोकसत्ता’नेच २२ डिसेंबरच्या अंकात दिले होते.
शाळा बंदच करायची असल्याने या अफरातफरींची चाडही शाळेच्या व्यवस्थापनाला वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे या वृत्तानंतर तरी संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याऐवजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या व प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याच्या नावाखाली शाळेतील शिक्षकांनाच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
शाळेचे हे गैरउद्योग गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू आहेत. इतर मराठी शाळा आपली विद्यार्थीसंख्या कायम राहावी, यासाठी झटत असताना या शाळेच्या चालकांनी मात्र ती बंद व्हावी यासाठी २०१२-१३ मध्ये चौथी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचवीला प्रवेशच नाकारले. मुलांनी शाळा सोडून जावे यासाठी त्यावेळी निकालाबरोबरच शाळेने पालकांच्या हातावर थेट ‘शाळा सोडल्या’चा दाखलाच ठेवला. ज्यांनी दाखला स्वीकारून प्रवेश रद्द करण्यास नकार दिला त्या पालकांना तो पोस्टाने पाठविण्यात आला. जी मुले वरच्या वर्गात शिकत आहेत, त्यांच्यावरही शाळा सोडून जाण्याबाबत सतत दबाव आणला जातो. या प्रकारांमुळे आता या शाळेत केवळ सातवीपासून पुढचे वर्ग कसेबसे तग धरून आहेत.
सातवी-आठवीचा प्रत्येकी एक तर नववी-दहावीच्या प्रत्येकी दोन अशा केवळ चारच तुकडय़ा शाळेत आहेत. या शाळेवर शिकविणाऱ्या शिक्षकांचीही पद्धतशीर छळवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांच्या बढती, वेतनवाढी रोखणे, महिला शिक्षकांना अपशब्द वापरणे असे नाना प्रकार सुरू असतात. या प्रकाराला कंटाळून पालकांनी व शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही.
हा तर बाहेरच्यांचा डाव!
संस्थेचे चालक-पालक असलेल्या सचिव प्रकाश बंदरे या संस्थाचालकांना मात्र शाळेला आलेल्या अवकळेला आपण जबाबदार असल्याचे वाटत नाही. शाळेतील गैरव्यवहारांशी व्यवस्थापनाचा काडीचाही संबंध नसून शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि बाहेरच्या व्यक्ती जबाबदार आहे, असा आरोपही बंदरे यांनी केला. पाचवीला कुणी विद्यार्थीच न आल्याने आम्ही प्रवेश केले नाहीत. तसेच, शिक्षकांच्या नाठाळपणामुळे शाळेची ही दुरवस्था झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.