राज्य शासनाच्या मनमानी धोरणामुळे नागपूर जिल्ह्य़ातील शेकडो खासगी अनुदानित शाळांतील ८४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. नागपूर जिल्ह्य़ात एकूण ४१४ खासगी अनुदानित शाळा आहेत. त्यापैकी १५० शाळांमधील ८४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे कोणतेही समायोजन न करता शासनाने त्यांचे वेतन रोखले असल्याने कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील मान्यताप्राप्त खासगी विना अनुदानित शाळेतील सेवा ज्येष्ठता, निवड वेतन श्रेणी तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी शासन निर्णय निर्गमित केला होता. खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी त्या लाभांपासून अद्याप वंचित आहेत. विधिमंडळातील लक्षवेधीवर शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आश्वासन देऊन संबंधित शासन निर्णय काढला होता. मात्र, अद्याप त्याचे फायदे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीत.
दुसरे म्हणजे ऑनलाईन वेतन प्रणालीद्वारे एप्रिलपासून खाजगी प्राथमिक शाळांना वेतन देयके सादर करायची होती. बहुतांश शाळांनी देयके वेतन पथक कार्यालयाकडे सादरही केली. परंतु अद्याप एकाही शाळेचे वेतन देयक मंजूर करण्यात आलेले नाही. वेतन देयक सादर करण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर पदांना मंजुरी घेऊन स्किम व भत्ते देण्यात येतात, परंतु अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न या ऑनलाईन प्रणालीमध्ये निर्माण झाला असून तो सोडवण्याबाबत शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालय उदासीन असल्याचा आरोप आमदार नागो गाणार यांनी केला आहे. जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे इतरत्र समायोजन होत नाही, तोपर्यंत त्याच आस्थापनेवर कार्यरत राहत असल्यामुळे त्यांना ऑनलाईनद्वारे पद मंजुरी देऊन वेतन द्यावे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत वेतनापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी गाणार यांनी केली आहे.
ज्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकेतर पदे मंजूर होती, परंतु पटसंख्या कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून पदांना मंजुरी कायम ठेवण्यात येत होती आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे इतरत्र समायोजन होईपर्यंत त्यात आस्थापनेवरून त्यांना वेतन अदा केले जात होते. मात्र, विभागीय शिक्षण कार्यालयात शासन निर्णय नसतानाही षडयंत्र रचून २०१३-१४च्या संच मान्यतेत खाजगी प्राथमिक शाळांना शिक्षकेत पदेच दिली नाहीत. अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याबाबत शासन निर्णय नसताना अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप नागो गाणार यांनी केला आहे. त्यामुळेच होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा खासगी
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष वीरेंद्र फुलाडी आणि कार्यवाह राजेंद्र नखाते यांनी दिला आहे. आंदोलनाचे टप्पे ठरवण्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.