तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या पोलीस कोठडीत वाढ न करण्यासाठी आणि न्यायालयीन कोठडीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी १५ हजार रूपयांची मागणी करून तडजोडअंती १० हजार रूपये स्वीकारणाऱ्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली.
तक्रारदाराचा भाऊ, भाचा आणि इतर दोन व्यक्तींविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस टाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना या गुन्ह्य़ात दोन मे रोजी अटक करण्यात आली असून सहा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांची पुन्हा पोलीस कोठडी वाढवू नये तसेच न्यायालयीन कोठडीसंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी हवालदार राजेंद्रसिंग राजपूत याने तक्रारदाराकडे १५ हजार रूपये मागितले. ही रक्कम अधिक असल्याने तक्रारदाराच्या विनंतीवरून रक्कम १० हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यावर रचण्यात आलेल्या सापळ्यात बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास न्यायालयाच्या आवारातच लाच स्वीकारताना राजपूत यास पकडण्यात आले.