टॅक्सी चालकाकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रदीप आंबेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मंगळवारी १ जानेवारी रोजी पहाटे फिर्यादी टॅक्सीचालक जुहू येथून वांद्रे वरळी सागरी सेतूवर जात होता. त्यावेळी टोल नाक्याच्या अलीकडे सुरू असलेल्या नाकाबंदीच्या वेळी त्याची टॅक्सी अडविण्यात आली. पोलीस हवालदार प्रदीप आंबेकर याने कागदपत्रांची तपासणी केली. मात्र त्याच्याकडे वाहन परवाना नव्हता. तो यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी जमा करून घेतला होता. मुदत संपूनही फिर्यादीने तो परत घेतलेला नव्हता. तसेच त्याने बेकायदेशीरपणे ब्रेकलाईटही लावले होते. यावेळी जर कायदेशीर कारवाई केली तर १० हजार दंड होईल आणि टॅक्सी जमा होईल, असे सांगत आंबेकर याने त्याच्याकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
 फिर्यादी टॅक्सीचालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी दुपारी त्याने पैसे देण्यासाठी फिर्यादीला वांद्रय़ाच्या लकी हॉटेलसमोरील बीट चौकीवर बोलावले होते. त्यावेळी लाचेच्या रकमेपैकी आंबेकर याला दीड हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.