कोल्हापूर जिल्हय़ातील बांधकाम कामगारांनी गुरूवारी काढलेल्या मोर्चाची निष्पत्ती दिवाळी आणि होळीला संमिश्र अनुभव देणारी ठरली. बांधकाम कामगारांना घरबांधणी अनुदानात १ लाखावरून २ लाख रूपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांना ही दिवाळी भेट ठरली. तर, 20 टक्केबोनसचा निर्णय त्वरित जाहीर न झाल्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ़ यांच्या कागल गावात शिमगा साजरा करण्याचा इशारा कामगार नेत्यांनी दिला. कामगारांचा सहभाग प्रचंड असल्याने मोर्चाला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. 
बांधकाम कामगारांना २० टक्के बोनस मिळावा या व अन्य मागण्यांसाठी आज लालबावटा व्यवसाय कामगार संघटना इचलकरंजीतर्फे कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
या मागणीचे निवेदन कामगार आयुक्तांना देण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत कॉ.भरमा कांबळे, उत्तम नारकर, प्रा.सुभाष जाधव, शिवाजी मगदम, सर्जेराव कांबळे, प्रकाश कुंभार, जोतिराम मोरे, दत्ता गायकवाड, मधुकर ढेंगे आदींनी भाग घेतला. 20 टक्के बोनसच्या मागणीवर प्रदीर्घ चर्चा होऊन निर्णय झाला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी कागल येथे शिमगा करण्याचा इशारा दिला. घरबांधणीसाठी १ लाखाऐवजी ५ लाख अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर 2 लाख रूपये देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. अन्य प्रश्नांबाबत लवकरच कामगार मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन गुजर यांनी दिले.