मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी शासनाने एकूण ३६ जिल्ह्य़ांपैकी ३४ जिल्ह्य़ांमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांची स्थापना ग्राहकांच्या सोयीसाठी केली आहे. ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२२६२ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये मोफत सल्ला उपलब्ध होत आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यात एकूण ४० जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत असून राज्यस्तरावर ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, त्यांचे हक्क व अधिकारी अबाधित राहावेत व त्यांच्या तक्रारींचे निराकरण तत्परतेने व्हावे, यासाठी १५ मार्च २०१५ रोजी ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्याचे एक नवीन र्सवकष ग्राहक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व ग्राहक चळवळ सक्षम करण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.