नागरिकांमध्ये संताप
उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींना तसेच उरण नगरपालिका क्षेत्रात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रानसई धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा चांगला असल्याचा दावा केला आहे. हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल शासनाच्या आरोग्य विभागाकडून मिळत असल्याची माहिती एम.आय.डी.सी.चे अभियंता डी. जी. पवार यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातील नागरिकांना रानसई धराणातून पाणीपुरवठा केला जातो. या तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती तसेच उरण नगरपालिका क्षेत्रातही या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणपणे पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणावर उद्भवते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. उरण नगरपालिकेमार्फत सोडण्यात येणारे पाणी दूषित असल्याची तक्रार आसावरी घरत या गृहिणीने केली, तर ग्रामपंचायतींच्या हद्दीतही दूषित पाणी येत आहे, असे काही नागरिकांनी सांगितले. उरण नगरपालिकेची पाण्याची टाकी अस्वच्छ आहे. तसेच अनेक ठिकाणी गटारातून पाण्याची लाइन गेलेली आहे. पाण्याच्या पाइपलाइनला गळती लागत असल्याने दूषित पाणी येत असावे. रानसई धरणातील पाण्याची तपासणी दररोज केली जाते. त्यासाठी धरणाच्या पाण्याचे नमुने कोकणभवन येथील महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठविले जात आहेत. हे नमुने योग्य असल्याचा दावा एम.आय.डी.सी.ने केला आहे.