कोल्हापूर जिल्हय़ात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला. संततधार सुरू असल्याने जिल्हय़ातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दिवसभरात शहरातील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी दोन फुटाने वाढली. कळंबा भागात पाणी घरात घुसल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.गगनबावडय़ात सर्वाधित ११५ मि.मी. पाऊस पडला.     
काल गुरुवार सकाळपासून पावसाने ठाण मांडले आहे. आजही दिवसभर दमदार पाऊस सुरू होता. जोरदार सरी कोसळत असताना मधूनच पाऊस विश्रांतीही घेत होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कळंबा या उपनगरातील नागरिकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. रस्त्यांची उंची अधिक असल्याने तेथील पाणी घरामध्ये शिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाल्याचेही त्यांचे म्हणणे होते.     संततधारेमुळे जिल्हय़ातील सर्वच नद्यांच्या तसेच धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासांत सरासरी ३८.४ मि.मी. इतका पाऊस झाला. गगनबावडा ११५, शाहूवाडी ५५, राधानगरी ३५.७०, आजरा ३५.५०, गडहिंग्लज ३४, भुदरगड ५१, चंदगड ४५, शिरोळ २९, कागल १९, पन्हाळा १६, करवीर १८, हातकणंगले ८ मि.मी. इतका पाऊस पडला.     
राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा या प्रमुख धरणांचा जलसंचय वाढीस लागला आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर सकाळीच २८ फूट ८ इंच पाणी होते. तर सायंकाळी त्यामध्ये दीड फुटाने वाढ झाली आहे. रुई ५५ फूट ५ इंच, इचलकरंजी ५२ फूट ६ इंच, तेरवाड ४४ फूट, शिरोळ ३४ फूट ६ इंच व नृसिंहवाडी २५ फूट इतकी पाणीपातळी होती. दरम्यान पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह ७, भोगावती नदीवरील ४ व कासारी नदीवरील ६ तर वेदगंगा नदीवरील २ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पूरपरिस्थितीमुळे एसटी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आठ पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. सहा मार्ग अंशत: व एक मार्ग पूर्ण बंद आहे.     
जिल्हय़ात पेरणीच्या व आंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप भात धूळवाफ पेरणी केलेल्या क्षेत्रावर आंतरमशागतीच्या कामांना गतीने आली आहे. रोपलागणीची कामे प्रगतिपथावर आहे. खरीप ज्वारीच्या पेरण्या व भुईमुगाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. ऊसपिकाची वाढ समाधानकारक आहे.
जीप वाहून गेली
कोल्हापूर शहराजवळ असलेल्या उत्तरेश्वर-शिंगणापूर रस्त्यावर एक जीप उभी केली होती.
कोणीतरी ती पंचगंगा नदीपात्रात ढकलून दिली. जीप वाहून जात असल्याचे पाहून बघ्यांनी आरडाओरडा केला. तर काहींनी जीपमधून चार ते पाचजण वाहून गेल्याची अफवा पसरवली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाच्या पथकाने वाहून जाणारी जीप तासाभराच्या प्रयत्नानंतर वर काढली. तर पोलिसांनी चौकशी केली असता जीपमालकाने कसलाही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट केले.