अनेक दिवसांपासून शेतकरी ज्याची चातकासारखी वाट पाहात होते, त्या पावसाने नागपूर जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र हजेरी लावली आहे. जिल्ह्य़ात या पावसाळ्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस पडला असून नागपूर ग्रामीण, काटोल व कळमेश्वर तालुक्यांत सरासरी ओलांडली आहे. नागपूर शहरात ४२.२ मि. मी. पाऊस झाला. अनेक वर्षांनंतर सलग तिसऱ्या दिवशी पावसाची झड लागण्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
दीड महिना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. उकाडय़ामुळे नागरिक हैराण झालेले असताना जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ातही फारसा पाऊस न पडल्याने चिंतेत आणखी भर पडली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर पावसाच्या झडीचे दृश्य दिसत आहे. नागपूर जिल्ह्य़ाची १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील पावसाची सरासरी १०३७.४५ मि.मी. असते. यावर्षी १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी २२४.३० मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्य़ात आतापर्यंत सर्वाधिक, म्हणजे ४९३.६  मिमी (१०१.९ टक्के) पाऊस नागपूर ग्रामीण भागात पडला आहे. नागपूर शहरात ४२ मिमी , भिवापूर तालुक्यात ११० मिमी , कळमेश्वर तालुक्यात ४६ मिमी (१२६ टक्के) आणि काटोल तालुक्यात ४२ मिमी (१०८.४ टक्के) पाऊस झाला असून जवळजवळ सरासरी गाठली आहे. याशिवाय पारशिवनी व उमरेड तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्य़ात यावर्षी पिकांची स्थिती चांगली राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नरखेड , रामटेक , सावनेर या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झाला आहे. नागपूर शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळी वातावरणाचे साम्राज्य असून सूर्यदर्शन झालेले नाही. गेले तीन-चार दिवस अधूनमधून थोडी विश्रांती घेत पाऊस सुरू आहे.
सोमवारी रात्रभर पडत असलेला पाऊस आज दुपापर्यंत सुरू असल्याने खऱ्या अर्थाने पावसाळा अनुभवता आला. संततधार पावसामुळे शहरातील विविध भागातील खोलगट भागात पाणी साचले असून लोकांना त्यातून वाहने काढणे कठीण झाले होते. सकाळपासून संततधार सुरू असताना शाळेत जाणाऱ्या विद्याथ्यार्ंना त्याचा फटका बसला.
शाळेतील संख्या आज रोडावली होती. पावसाळ्यापूर्वीच मेनहोलवरची झाकणे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अजूनही अनेक भागात मेनहोल उघडे आहेत. त्यामुळे गटर भरले की त्यातील दूषित पाणी बाहेर येत असल्याचे दिसून आले. झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले आहे. जागनाथ बुधवारी भागात एका पडक्या घराची भिंत पडली आहे. मात्र, त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. पावसापासून बचावासाठी रेनकोट किंवा छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडणे कठीण झाले होते.
या पावसामुळे वातावरणातील उष्मा गायब होऊन गारवा आलेला आहे. चहाच्या टपऱ्यांवरील वर्दळ वाढली असून भुट्टा (मक्याचे कणीस) विक्रेत्यांचा हंगामी व्यवसायही तेजीत आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा
येत्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे सखल भागात किंवा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.