कालपासून आगमन झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्हय़ात सलग दुसऱ्या दिवशी चांगली वृष्टी केली. दिवसभर पावसाचे प्रमाण कमीअधिक असले तरी नागरिकांना पावसापासून बचाव करीतच दिवसभर वावरावे लागले. जिल्हय़ाच्या धरणग्रस्त भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. तर पावसाने गती घेतल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामातील मशागतीसाठी सध्याचा पाऊस उपयुक्त ठरत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पन्हाळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.    
जिल्हय़ाच्या बहुतेक तालुक्यांत वळिवाचा पाऊस चांगला झाला होता. पाठोपाठ मृग नक्षत्राचा पाऊस दमदारपणे पडत आहे. आज जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे.    
खरीप भातासाठी धूळवाफ पेरणी सुरू असून रोपवाटिका तयार करण्यासाठी पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. ज्वारीसाठी मशागतीची कामे, सोयाबीन, भुईमुगासाठी ओलिताखाली असलेल्या ठिकाणी काही प्रमाणासाठी पेरणी सुरू आहे. पूर्वहंगामी उसाची भरणीकामे पूर्ण होऊन उसाची वाढ समाधानकारक आहे. एकंदरीतच खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.    
दरम्यान, विजेचा धक्का बसल्याने शेतकाम करणारी एक महिला जागीच ठार झाली. तर एकजण गंभीर जखमी झाली. हा प्रकार शुक्रवारी कुशिरे तर्फ बोरगाव येथे घडला. संगीता बाजीराव गुरव (वय ३५) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर छाया संतोष पाटील (वय ३०) ही जखमी झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील कुशिरे तर्फ बोरगाव येथे अशोक महादेव पाटील यांचे शेत आहे. बाडे शेत म्हणून ते ओळखले जाते. या शेतामध्ये आज संगीता गुरव, छाया पाटील या काम करीत होत्या. शेतातून गेलेली विजेची तार कट होऊन शेतात पडली. ती तार तुटण्याच्या अवस्थेत असावी अथवा वादळी वाऱ्यामुळे ती खाली पडली असावी अशी शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे. या तारेचा स्पर्श झाल्याने गुरव या जागीच ठार झाल्या. तर जखमी झालेल्या छाया पाटील यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले आहे.    
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत जिल्हय़ातील तालुकानिहाय पावसाचे प्रमाण याप्रमाणे : करवीर-३.८, कागल-११, पन्हाळा-९, शाहूवाडी-२१, हातकणंगले-४, शिरोळ-३, राधानगरी-३१, गगनबावडा-६०,आजरा-१६, चंदगड-१७, गडहिंग्लज-४, भुदरगड-१२ मि.मी.