श्री गणरायापाठोपाठ गौरीचे शुभागमन होताना वरुणराजाने सोलापूर शहर व जिल्हयात पुन्हा दमदार हजेरी लावली. गेल्या सलग चार दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळी अकरानंतर सुरू झालेला पाऊस तीन तासांपर्यंत बरसत होता.     
काल मंगळवारी जिल्हयात १७.३२ मिलिमीटर सरासरीने १९०.५१ मिमी इतका पाऊस झाला होता. पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी अशी- माढा – ३६.८९, करमाळा- ३५.७५, बार्शी-२३.५६, दक्षिण सोलापूर- १६.९१, अक्कलकोट-१६.५९, माळशिरस- १५.२०, मोहोळ- १४.३१, पंढरपूर- १०.७७, सांगोला- ८.०८, उत्तर सोलापूर- ७.९४ व मंगळवेढा- ४.५१ आतापर्यंत  जिल्हयात ६६.५८ टक्के इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक ९०.८८ टक्के पाऊस माढा तालुक्यात झाला आहे. तर माळशिरस (८३.३३ टक्के), उत्तर सोलापूर (७०.३५ टक्के) बार्शी (६९.२५ टक्के), करमाळा (६७.४४ टक्के), पंढरपूर (६७.१९ टक्के) मोहोळ (६६.२९ टक्के), अक्कलकोट (५९.७७ टक्के), दक्षिण सोलापूर (५६.२८ टक्के) याप्रमाणे पावसाची टक्केवारी आहे. दुष्काळग्रस्त सांगोल्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प (५६.११ टक्के) व असून तर मंगळवेढय़ात आजतागायत केवळ ४९.११ टक्के पाऊस पडला आहे.  
बुधवारी सकाळी अकरापासून धो धो पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे रस्ते जलमय होऊन वाहतुकीवर परिणाम झाला होता. विशेषत: शालेय मुला-मुलींची शाळेत जाताना मोठी तारांबळ उडाली. सखल भागात पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांचे हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. हा पाऊस ग्रामीण भागातही बरसल्यामुळे शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला.