प्रवरा नदीपात्रातील वाळू उपशाचा ठेका घेतला एका गावाचा अन् वाळुचा अनधिकृत उपसा केला दुसऱ्या गावातून, असा प्रकार घडूनही महसूल खात्याने ठेका रद्द करण्याऐवजी केवळ पंचनामा केला. आता आंदोलनामुळे प्रशासन वठणीवर आले आहे.
प्रवरा नदीपात्रातील पिंपळगाव फुणगी (ता. राहुरी) येथील वाळुचा लिलाव करण्यात आला. ठेकेदाराने तेथील वाळ उचललीच पण गळनिंब व कुरणपूर (ता. श्रीरामपर) हद्दीतील वाळुचा उपसा केला. त्याविरूद्ध गावकऱ्यांनी आंदोलन केले. शिवराज्य पक्षाने त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर तहसीलदार अनिल पुरे यांनी उपशाचा पंचनामा केला. अनधिकृत वाळू उपशाचे मोजमाप केले. सुमारे दीड हजार ब्रास वाळ अनधिकृत रित्या श्रीरामपर तालुका हद्दीत उचलण्यात आली. अनधिकृत उपसा केल्यास ठेका रद्द करण्याचा सरकारचा नियम आहे. त्याचे पालन महसूल खात्याने केले नाही. उलट ठेकेदारांना पाठिशी घातले. तालुक्यातील पढेगाव येथेही यंत्राने प्रचंड वाळ उपसा होत आहे. त्यावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, एजाज पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी अनधिकृत वाळ उपशाविरूद्ध प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. अनधिकृत वाळू उपशाचा पंचनामा करण्यात आला असून त्याचा अहवाल राहुरीच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार दीपा मुधोळ यांना पाठविण्यात आला आहे. त्यानंतर ठेका रद्द करण्याची कारवाई केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. पंचनामा करून आठ दिवस झाले असले तरी अद्याप कुठलीही हालचाल करण्यात आलेली नाही.
राहुरी तालुक्यात मुळा नदी पात्रात राहुरी, देसवंडी, दरडगाव, चिखलठाण, पारनेर तालुका हद्दीत वनकुटे येथील वाळुचे लिलाव झालेले आहेत. तेथे अनधिकृत रित्या प्रचंड वाळू उपसा केला जात आहे. सरकारचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्याविरूद्ध कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले.