मुंबईमधील खड्डय़ांच्या ‘अर्थ’पूर्ण कामांना गेल्या १५ दिवसांमध्ये गती आली आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली असतानाही मुंबईतील खड्डय़ांची संख्या अचानक ४,६९७ ने वाढली आहे. ‘जास्त खड्डे म्हणजेच जास्त खर्च म्हणजेच जास्त कमाई’ या समीकरणानुसार खड्डय़ांची ही संख्या वाढली आहे. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने बाजूला काढलेली सर्वच्या सर्व रक्कम खर्च व्हायची तर (म्हणजेच आपल्या खिशात यायची तर) अधिकाधिक खड्डे बुजवायला हवेत या जाणीवेने ही खड्डेसंख्या वाढली आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही जुलै महिन्यात पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची पार दैना उडाली. उघडय़ा डोळ्यांनी सगळ्यांना हे खड्डे दिसत होते आणि वाहनांतून जाताना ‘जाणवत’ही होते. तरीही पालिकेच्या संगणक प्रणालीवर फारशा खड्डय़ांची नोंद झाली नव्हती. मुंबईतील रस्त्यांची चाळण झालेली असताना १ जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत पालिकेच्या संगणक प्रणालीवर केवळ ७,६४५ खड्डय़ांची नोंद झाली होती. विभाग कार्यालयाच्या हद्दीत फिरून खड्डे शोधून त्यांची छायाचित्रे मोबाइलवरून संगणक प्रणालीवर टाकण्याचे काम रस्ते विभागाच्या अभियंत्यांवर सोपविण्यात आले होते. परंतु पालिकेच्या वरळीच्या आरएमडी प्लान्टमधून डांबरमिश्रीत खडी घेऊन खड्डे बुजविण्याचे आदेश पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभाग कार्यालयांना दिल्यामुळे शोध मोहिमेची जबाबदारी खांद्यावर असलेले अभियंते विभाग कार्यालयात बसून होते. पालिकेचे कामगार घमेला, फावडा हाती घेऊन रस्तोरस्ती डांबरमिश्रीत खडी टाकून खड्डे बुजवताना दिसत होते. परंतु पावसाची हलकी सर आल्यानंतरही बुजवलेला खड्डा पुन्हा उखडला जात होता.
या काळात कंत्राटदार कमालीचे अस्वस्थ झाले. संगणक प्रणालीवर खड्डय़ांची फारशी नोंद होत नसल्याने त्यांना काम मिळत नव्हते. अखेर गणेशोत्सवाच्या आडून राजकीय वरदहस्त असलेल्या कंत्राटदारांनी आपल्या कारवाया सुरू केल्या. त्यानुसार पालिका विभाग कार्यालयात बसून असलेल्या अभियंत्यांना १५ दिवसांपासून अचानक खड्डे शोध मोहिमेवर धाडण्यात आले. अचानक आलेल्या आदेशाने अभियंतेही बिथरले आणि त्यांनी खड्डय़ांची छायाचित्रे संगणक प्रणालीवर टाकण्याचा धडाका लावला. संगणक प्रणालीवर १७ ऑगस्ट रोजी ७,६४५ खड्डय़ाची नोंद होती. ती २ सप्टेंबर रोजी तब्बल १२,३४२ वर पोहोचली. कंत्राटदारांचा धसका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभियंत्यांना कामाला लावल्यामुळे गेल्या १५ दिवसांमध्ये तब्बल ४,६९७ खड्डय़ांचा ‘शोध’ लागला आणि आता हे खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदारांच्या झोळीत पडणार आहे.
आतापर्यंत कंत्राटदारांनी १८ कोटी रुपयांचे खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेपैकी २८ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत पडून आहेत. ही रक्कम मिळविण्यासाठी कंत्राटदार आटापिटा करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यापुढे लोटांगण घालत अभियंत्यांना कामाला लावले आहे.