लढाऊ विमानांची बांधणी होणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या परिसरातील ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार यांच्या रंगलेल्या मद्यपार्टीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी या पार्टीचे आयोजक, टर्मिनल इमारतीचे काम करणारे ठेकेदार विलास बिरारी यांना पोलिसांनी अटक केली. दिंडोरी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
दरम्यान, संवेदनशील परिसरात आयोजिलेल्या पार्टीच्या आयोजकास अटक झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी पार्टीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. तपासात समोर येणाऱ्या बाबी लक्षात घेऊन पुढील कार्यवाही होईल असे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे. संवेदनशील भागातील शासकीय इमारतीत मद्यपान व नाचगाण्यासह पार्टी आयोजनाला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने परवानगी कशी दिली, असा प्रश्न राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे. नाशिकला हवाई नकाशावर आणण्यासाठी साकारलेल्या ओझर विमानतळाचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदाराने मद्यपार्टीसाठी केल्याची बाब उघड झाल्यानंतर ठेकेदारासह या विभागातील अधिकाऱ्यांकडून सारवासारव सुरू झाली. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीनिमित्त शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीत कर्कश डीजेचा आवाज, मद्यपानासह महिलांच्या नाचगाण्याचाही कार्यक्रम रंगल्याचे सांगितले जाते. स्थानिकांनी आक्षेप नोंदविल्यावर संबंधितांकडून शासकीय परवानगी घेऊन कार्यक्रम होत असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी भाजपच्या खासदारांनी विमानतळाची पाहणी करून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मनसेने देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या विमानतळावर झालेल्या पार्टीचा निषेध करत ठेकेदार आणि सांबा अधिकारी यांच्यातील मधुर संबंधांवर बोट ठेवले. शिवसेनेने पार्टीसाठी हे मैदान भाडेतत्त्वावर हवे अशी अपरोधिक मागणी केली आहे.
पार्टीवरून गदारोळ उडाल्यानंतर गुन्हा दाखल करावा की करू नये, याबाबत पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन मागविले होते. पार्टीचे संयोजक बिरारी रीतसर परवानगी घेऊन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा दावा केला होता. शासकीय इमारतीत मद्यपार्टीसाठी परवानगी दिल्यामुळे उत्पादन शुल्क विभाग आणि बांधकाम विभागही अडचणीत सापडले. या प्रकरणात पोलीस आणि जिल्हा प्रशासन ‘आस्ते कदम’ जात असल्याची ओरड होऊ लागल्यावर पोलिसांनी बिरारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. विनापरवानगी शासकीय इमारतीचा पार्टीसाठी वापर करणे, विनापरवानगी वाद्य वाजविणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिंडोरीच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी गुरुवारी बिरारी यांना अटक करण्यात आली. दिंडोरीच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, विमानतळावरील पार्टीसाठी बिल्डर असोसिएशनने उत्पादन शुल्क विभागाकडे १२, ५०० रुपये तर बांधकाम विभागाकडे १० हजार रुपये शुल्क भरले होते. याच आधारे रीतसर परवानगी घेऊन पार्टी आयोजित करण्यात आल्याचा दावा संबंधितांकडून केला गेला. तथापि, विमानतळावरील टर्मिनल इमारत हा संवेदनशील परिसर आहे. शासकीय संकुलात मद्यपार्टी करण्यास विमानतळावरील यंत्रणा, बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाने परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमानतळावरील मद्यपार्टीविषयीचा अहवाल पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला असला तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप मार्गदर्शन केलेले नाही. पार्टीत शासकीय अधिकारी व ठेकेदार सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी अनेक वाहनांचे क्रमांक लिहून ठेवले आहेत. पण, सहभागी झालेले कारवाईच्या कचाटय़ातून बाहेर आहेत. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, संयोजकाला अटक झाल्यानंतर तपासात निष्पन्न होणाऱ्या बाबींवरून पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.