संततधारेने शहरातील नुकतेच बुजविलेले खड्डे पुन्हा उखडण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाल्यामुळे खाचखळगे, चिखल अन् मोठे खड्डे या जाचात वाहनधारक अधिकाधिक गुरफटत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील बहुतेक रस्त्यांवर मार्गक्रमण करणे म्हणजे अडथळ्यांची धोकादायक शर्यत पार करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नव्याने बांधलेल्या रस्त्यांची हिच दुर्दशा झाल्यामुळे दुरूस्ती व देखभालीत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
पावसाळा अन् खड्डेमय रस्ते यांचे समीकरण काही नवीन नाही. यंदा काही अपवाद वगळता मुसळधार पाऊस झाला नसताना रस्त्यांची अवस्था बिकट झाली. यावरून ओरड झाल्यावर पालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेत वेगवेगळ्या रस्त्यांवरील दोन हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला. परंतु, बुजविलेल्या या खड्डय़ांची संततधारेने वाट लावली आहे. दरवर्षी रस्त्यांची बांधणी, नूतनीकरण यावर मोठा निधी खर्च केला जातो. पावसाळ्यात पुन्हा खड्डे बुजविण्यासाठी द्रव्य रिते केले जाते. वारंवार हे प्रकार घडत असूनही त्याची जबाबदारी सोयीस्करपणे टाळली जाते.
वास्तविक, रस्त्याचे काम झाल्यावर ३६ महिने त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. अशाही रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत बांधल्या गेलेल्या रस्त्यांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी त्यांच्यामार्फत सोयीस्करपणे टाळली गेली. मुळात, रस्त्याच्या कामाचा दर्जा न राखला गेल्याने त्याचा जाच वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, मागील दोन ते अडीच वर्षांत झालेल्या रस्त्यांच्या कामांचे अवलोकन करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे संकेत पालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिले. या रस्त्यांवरही वाहनधारकांची खाच खळग्यातून सुटका झालेली नाही. रस्त्यांची देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांना या माध्यमातून चाप बसू शकतो. काही दिवसांपूर्वी मुंबई पालिकेने ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याच धर्तीवर, नव्याने बांधलेल्या कोणकोणत्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली याची छाननी प्रशासन करेल. त्यात दोषी आढळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असे खंदारे यांनी सूचित केले. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात असले तरी ही तात्पुरती उपाययोजना ठरत असल्याचे त्यांनी मान्य केले.