08 August 2020

News Flash

महापौरांच्या भेटीसाठी कंत्राटदारांची धावाधाव..

पालिकेच्या अर्थसंकल्पाला सभागृहात मंजुरी देण्यापूर्वी त्यात फेरबदल करण्याचे अधिकार महापौरांना असल्यामुळे आपापल्या प्रभागांतील कामांची यादी घेऊन सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्या कार्यालयाबाहेब गर्दी

| March 1, 2014 12:58 pm

पालिकेच्या अर्थसंकल्पाला सभागृहात मंजुरी देण्यापूर्वी त्यात फेरबदल करण्याचे अधिकार महापौरांना असल्यामुळे आपापल्या प्रभागांतील कामांची यादी घेऊन सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्या कार्यालयाबाहेब गर्दी करू लागले आहेत. त्याचबरोबर निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पालिकेचे एखादे कोटय़वधींचे कंत्राट पदरात पडावे यासाठी कंत्राटदारही धडपड करीत असून महापौरांच्या मर्जीतील व्यक्तींची मनधरणी करत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.
पालिकेच्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी विविध योजनांची खैरात करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मंजुरीपूर्वी अर्थसंकल्पात फेरफार करण्याचे अधिकार स्थायी समिती अध्यक्षांना असल्याने कंत्राटदार त्यांच्या दालनाबाहेर रीघ लावतील अशी अपेक्षा होती. परंतु फारसे कंत्राटदार यावेळी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे पालिकेतील समाजवादी पार्टीच्या कार्यालयाबाहेर मात्र आठवडय़ातील ठरावीक दिवशी कंत्राटदारांचा चांगलाच राबता होता. मात्र स्थायी समितीमध्ये २०१४-१५ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळताच समाजवादी पार्टीच्या कार्यालयाबाहेर दिसणारे कंत्राटदार अचानक गायब झाले.
आता अर्थसंकल्पाला पालिका सभागृहाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी अर्थसंकल्पात काही छोटे-मोठे फेरबदल करण्याचे अधिकार महापौर या नात्याने सुनील प्रभू यांना आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरआपल्या प्रभागात काही विकासकामे करण्याचे मनसुबे सर्वपक्षीय नगरसेवकांनी रचले आहेत. स्वपक्षाच्या गटनेत्याकडून फारशी अपेक्षा नसल्याने थेट महापौरांचीच मनधरणी करून निधी मिळविण्याच्या प्रयत्नात इतर पक्षांचे नगरसेवक आहेत.
नगरसेवकांप्रमाणेच आता कंत्राटदारही धावपळ करीत आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर कामे मिळणार नाहीत याची कल्पना असल्याने आताच कामे पदरात पाडून घेण्यासाठी कंत्राटदार महापौर दालनाबाहेर गर्दी करू लागले आहेत. विविध कामानिमित्त येणारे मुंबईकर, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते, नगरसेवक यांच्या गर्दीत आता कंत्राटदारांची उपस्थिती ठळकपणे दिसू लागली आहे. मात्र कंत्राटदारांना दालनात पाठवू नये, अशी सक्त ताकीद सुनील प्रभू यांनी दिल्याने त्यांचे सचिव आणि दालनाच्या प्रवेशद्वारावर सज्ज असलेल्या शिपायांची तारांबळ उडाली आहे.
चुकून एखादा कंत्राटदार आत गेलाच तर महापौरांचा रोष ओढवू नये यासाठी सर्वच कर्मचारी त्रस्त झाले असून केव्हा एकदा त्या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळते असे त्यांना झाले आहे. महापौरांच्या दालनात प्रवेश मिळत नसल्यामुळे कंत्राटदार निरनिराळ्या क्लृप्त्या लढवित आहेत. महापौरांशीसलगी असलेले नेते, अधिकारी आदींचा शोध घेण्यासाठी कंत्राटदारांनी आपली माणसे पेरली असून त्यांच्याकरवी सुनील प्रभू यांच्याशी ‘गुफ्तगू’ करण्याची संधी साधण्याचा कंत्राटदारांचा प्रयत्न आहे. परंतु अद्याप यश येत नसल्याने ते कासावीस होऊ लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2014 12:58 pm

Web Title: contractors rush to meet mumbai mayor
टॅग Contractors
Next Stories
1 पोलिसांचा ‘फिल्मी’ सापळा
2 ‘सह्यद्री’ वाहिनीचे ‘हिरकणी’ पुरस्कार प्रदान
3 तिकीट खिडकीच्या स्थलांतराने दिलासा
Just Now!
X