छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व मनसे या राजकीय पक्षांसह विविध सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. यानिमित्ताने शहर परिसर भगवामय होत असून काही ठिकाणी कमानीही उभारण्यात आल्या आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रंगरंगोटीसह आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. यंदा दुष्काळाचे संकट भेडसावत असल्याने शिवजयंतीवर त्याचे सावट राहणार आहे. पोलीस व सामाजिक संघटनांनी शिवजयंती साध्या पद्धतीने व शांततेत साजरी करावी, असे आवाहन केले आहे.
शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जात असली तरी शिवसेना, मनसे यांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. नाशिकरोड येथे शिवसेनेतर्फे शिव जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती विभागप्रमुख नितीन चिडे यांनी दिली. शनिवारी सकाळी ९ वाजता आ. बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह आजीमाजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येईल. यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवसेना जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता शिवाजी पुतळा चौकात दारूगोळ्याची आतिषबाजी करण्यात येईल. प्रत्येक प्रभागातील शाखेचा चित्ररथ हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ राहणार असल्याचे सागर गायकवाड यांनी सांगितले. तसेच नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी पुतळा चौक, सिन्नर फाटा येथील चौफुली, बिटको चौक, देवळाली गाव या ठिकाणीही शिवजयंतीची उत्साहात तयारी सुरू असून अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भगवे ध्वज लावून वातावरणनिर्मिती केली आहे. मिरवणुकीच्या दिवशी छत्रपती शिवाजी चौकात व्यासपीठ उभारून शिवजयंतीत सहभागी झालेल्या मंडळे व चित्ररथांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, मनसेच्या वतीने शहर परिसरात ठिकठिकाणी भगवे ध्वज उभारण्यात आले असून मुंबई नाका येथे शिवरायांची आसनारूढ प्रतिमा देखाव्याच्या स्वरूपात लावण्यात आली आहे. शिवजयंती निमित्ताने शहरातील वाकडी बारव येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक या वेळी बंद ठेवली जाणार आहे. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मनमाड येथे शिवजयंती मिरवणुकीत गुलालाचा वापर केला जाणार नसल्याचे मनसे शहराध्यक्ष सुनील हांडगे यांनी सांगितले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई असून काटकसरीने पाणी वापर होत आहे. गुलालाचा वापर झाल्यास स्नान करण्यासाठी तसेच गुलालाने माखलेले कपडे धुण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होणार आहे. सध्याच्या तीव्र पाणीटंचाईची जाणीव ठेवून गुलाल न वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हांडगे यांनी सांगितले. शहादा येथे शहरात मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे मराठा कुणबी पाटील समाज मंडळ, क्षत्रिय मराठा समाज मंडळ व शिवसेनेने ठरविले आहे. शिवप्रतिमा पूजन व जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. मराठा कुणबी पाटील समाज व क्षत्रिय मराठा समाज मंडळातर्फे शनिवारी विश्रामगृहाजवळ फलक अनावरण जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजय अपरांती यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रा. दत्ता वाघ, नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती श्याम जाधव, जि. प. उपाध्यक्ष शिक्षण मंडळ सभापती जयपाल रावल आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सात वाजता जनता चौकात ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. शिवसेनेच्या वतीने सकाळी ११ वाजता शिवप्रतिमेचे पूजन डॉ. अपरांती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रमोद भामरे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पो. निरीक्षक राजेंद्र रायसिंग आदी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी केले आहे.

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागही सज्ज झाला आहे. यंदा दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शिवजयंतीचा उत्साह फारसा जाणवत नसला, तरी अनेक मंडळांनी जयंतीच्या खर्चाला फाटा देत जमा करण्यात आलेल्या निधीचा विनियोग दुष्काळग्रस्तांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या सटाणा तालुक्यातील टेंभे (खालचे) गावात तारखेप्रमाणे मागील महिन्यातच शिवजयंती साजरी करण्यात आली असली, तरी शिवप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या शनिवारच्या जयंतीदिनीही शिवरायांना अभिवादन करण्यात येणार आहे. या गावातील शिवरायांचा पुतळा हा जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीच्या (१५ फूट) अश्वारूढ पुतळ्यांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच हा पुतळा म्हणजे या गावाचे वैभव झाले आहे.