जिल्ह्य़ातील काही चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या खोटय़ा नोंदी दाखविल्या जात असून त्याची चौकशी केली जाईल. उपविभागीय अधिकाऱ्यांना या अनुषंगाने कळविण्यात आले असून छावण्यांमधील गैरप्रकार नियंत्रणात आणले जातील, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जिल्ह्य़ात ५० छावण्या सुरू असून त्यात २५ हजार लहान-मोठी जनावरे दाखल आहेत. खासगी स्वरूपातील ८ छावण्यांमध्ये २ हजार २०० जनावरे असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंधारणाच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात निधी मिळाला. कृषी विभागामार्फत जलसंधारणाची कामे हाती घेतली जातील. विशेष म्हणजे काही औद्योगिक संघटनांनी या कामात पुढाकार घेतला आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने जिल्ह्य़ातील ५ गावांमध्ये शिरपूर पॅटर्न पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार असून वेगवेगळे उद्योजक, त्यांच्या संघटना टँकर व इतर सर्व प्रकारची मदत द्यायला पुढे आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. जळालेल्या फळबागांपोटी सरकारकडून आलेल्या ३२ कोटींच्या मदतीचे वाटप सुरू झाले असून, ज्यांनी फळझाडांची छाटणी केली आहे व जे मदतीसाठी पात्र आहेत, अशा शेतक ऱ्यांना १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जिल्ह्य़ात १५६ विहिरी खोल करण्यात येणार असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हा प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ात टँकरची संख्या दररोज वाढत असून ५७५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टँकरच्या १ हजार ३०० खेपा होत असून जायकवाडीतून १७० टँकरमध्ये पाणी भरले जाते. एकूण टँकरपैकी ३३ टक्के टँकर जायकवाडीच्या जलाशयातून भरले जात आहेत. जिल्ह्य़ात आणखी चार ठिकाणी चर खोदून पाणी उपसले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.