खारघर टोलनाक्यातून सिडको वसाहतीमधील कारला अधिसूचनेत सवलत मिळाली खरी, मात्र स्थानिकांच्या या व्याख्येत शालेय बस येत नसल्याने खारघर टोलचा भरुदड खारघर व पनवेलमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर दोन दिवसांपासून पडला आहे. वाहतूक कोंडीसह दिवसाला ४४० रुपये द्या, अन्यथा साडेपाच हजार मासिक पास घ्या, असा पवित्रा टोल वसूल करणाऱ्या कंपनीने घेतल्याने पनवेलच्या सुमारे ३०० शालेय बसना याचा फटका बसला आहे. ही अतिरिक्त वाढ पालकांच्या खिशातून वसूल करण्याचा काही शालेय व्यवस्थापनाने विचार केल्याने अखेर सरकारच्या स्थानिकांच्या व्याख्येत पनवेलचे पालक येत नाहीत का, असा सूर पालकवर्गातून ऐकायला मिळत आहे.
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च महिन्याच्या २०१३ पर्यंत पनवेलमध्ये ३९१५७ वाहनांची नोंद झालेली आहे. यामध्ये चारचाकी वाहने (कार) १९९३० आहेत. टॅक्सी मोटार ८१७, शालेय बस २३९, इतर वापरातील मोटारी ६७१३, ट्रक व लॉरी ६६४१ व इतर वाहने आहेत. खारघर वसाहतीमध्ये असणाऱ्या नामांकित शिक्षण संस्था आहेत. तसेच खांदेश्वर, कळंबोली, पनवेलमध्ये असणाऱ्या शैक्षणिक संस्थेमुळे विद्यार्थी खारघर व पनवेल परिसराशी जोडले गेले आहेत. चार किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या अध्र्या तासांचा वाहतुकीचा खोळंबा व त्यानंतर टोलधाड शालेय बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावी लागते. खारघर टोलनाक्यावरील कोंडी लक्षात घेऊन गृहिणींचे नियोजन कोलमडले आहे. वेळेत शाळा व महाविद्यालयात मुले पोहचावीत म्हणून शालेय बसच्या वेळा बदल्याने पालकांची पहाट लवकर होत आहे. विद्यार्थ्यांची नेआण करण्यासाठी शालेय बसला खारघर ते पनवेल अशा चार फेऱ्या माराव्या लागतात. एका फेरीचे ११० रुपये भरल्यास २६ दिवसांचे ११ हजारांवरील रक्कम होते. एसपीटीपीएल कंपनीचा मासिक पास घेतल्यास साडेपाच हजार रुपयांमध्ये शालेय बसला जाता येणार आहे. मात्र हे साडेपाच हजार रुपये भरायचे कोणी असा प्रश्न शालेय व्यवस्थापन, बस कंत्राटदार व पालकांना पडला आहे. यामुळे शालेय व्यवस्थापनाने शालेय बसना टोलनाक्यातून वगळावे अशी मागणी समोर येत आहे. परंतु ही मागणी मान्य न झाल्यास पनवेलच्या शालेय विद्यार्थ्यांचे वाहतूक शुल्क वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.