भारताच्या तुलनेत परदेशांमध्ये सहकारी बँकाची संख्या मोठी आहे. अमेरिकेत तब्बल साडे चौदा हजारांहून अधिक, तर फ्रान्समध्ये सुमारे सात हजाराहून अधिक सहकारी बँका आहेत. पाश्चात्यांच्या धर्तीवर आपल्याकडे रिझव्‍‌र्ह बँक ही सहकारी बँकांचे नियमन करत असते. मात्र केवळ नियमन करून भागणार नाही, तर अशा सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी सरकारच्या वतीने स्वतंत्र धोरण आखण्याची गरज आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी डीएनएस बँकेच्या घोडबंदर शाखेच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या घोडबंदर शाखेचे उद्घाटन शनिवारी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे उपस्थित होते. माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्या काळात सहकारी बँकांचे खच्चीकरण झाले. रिझव्‍‌र्ह बँक सहकारी बँकांना सापत्न वागणूक देत आहे. आज केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. पण त्यांचेही सहकारी बँकांकडे अजिबात लक्ष नाही. आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात लक्ष घालावे, असा सल्ला कुबेर यांनी यावेळी दिला.
संजय केळकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये सहकारी बँकांच्या विश्वासार्हतेबद्दलचे विचार मांडले. सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करणारे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी असतील तर बँकेला पहिल्या दिवशीही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. ठाणे, डोंबिवलीतील अनेक सहकारी बँकांनी हे दाखवून दिले आहे. मात्र बँक लुटणारी माणसे असतील तर मात्र ठेवीदारांना देशोधडीला लावण्याची वेळ येते. पेण अर्बन बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांवर ही वेळ आली असून त्यांच्यासाठी गेली पाच ते सहा वर्षांपासून संघर्ष सुरू असल्याचे केळकरांनी सांगितले. सहकाराचे जाळे हे सामान्य माणसांचा आधार असल्याचे नमूद करून कुबेर यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा शासनाकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उदय कर्वे यांनी डीएनएस बँकेची माहिती प्रास्ताविकात देऊन सर्वाचे स्वागत केले. शनिवारी सुरू झालेल्या डीएनएस बँकेची घोडबंदर शाखा ही ४३वी शाखा असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी १०० खाती उघडून या बँकेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राती १३ जिल्ह्यांमध्ये बँकांचे अस्तित्व असून सुरुवातीपासूनच तिला ‘अ’ वर्ग मिळाल्याचे या प्रसंगी कर्वे यांनी सांगितले.
टीजेएसबी बॅंक, ठाणे सहकारी बॅंक, पर्यावरण दक्षता मंच आदी संस्थांचे पदाधिकारी आणि घोडबंदर भागातील रहिवासी या सोहळ्यास उपस्थित होते.