योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य बंदोबस्ताचे नियोजन
मुंबई पोलीस दलात अपुरे कर्मचारी असल्याने अनेक समस्या भेडसावतात. त्यात भर म्हणजे, योग्य नियोजनच नसल्याने आहेत त्या पोलिसांनाही कुठेही बंदोबस्ताला पाठविले जाते. बऱ्याचदा बंदोबस्ताच्या नावाखाली हे पोलीस तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडतात. त्यामुळे जेथे गरज नाही तेथे असलेले अपुरे पोलीस बळही वाया जाते. यावर उपाय म्हणून मध्य प्रादेशिक पोलीस आयुक्तांनी ‘कॉप स्ट्रेच’ अर्थात विस्तारित पोलीस ही अनोखी पद्धत राबविण्यास सुरवात केली आहे. उपलब्ध पोलीस बळाचा नियोजनबद्ध वापर केल्यास सर्व कामे अधिक सुयोग्यपणे पार पडतात, हे या नव्या पद्धतीने साधले जात आहे.
  पोलिसांची सध्याच्या बंदोबस्ताची पद्धत ही अत्यंत जुनाट, वेळखाऊ आणि बिनकामाची आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल तर त्या जागी बंदोबस्तावर जाण्याची सूचना भल्या सकाळी दोन पोलीस हवालदारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देतात. सकाळी ९ वाजता ते दोन पोलीस तेथे जातात आणि पुढची सूचना मिळेपर्यंत तिथेच बसून राहतात. तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंतर कामाच्या धावपळीत त्यांना सूचना देऊ शकत नाही. तोपर्यंत हे दोन पोलीस ‘वरून सूचना आलेली नाही,’ या कारणास्तव दिवसभर त्याच ठिकाणी बसून राहतात. खरेतर त्या बंदोबस्तावर काही कालावधीनंतर त्यांची काहीच आवश्यकता नसते. यातून मनुष्य बळाचा अपव्यव होतो. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर साधणारी ‘कॉप स्ट्रेच’ योजना अंमलात आणली.

काय आहे योजना?
काही ठिकाणी विशिष्ट वेळेत पोलीस बंदोबस्ताची खरी आवश्यकता असते. उदा. सकाळी शाळा भरताना आणि दुपारी सुटते तेव्हा, सकाळी आणि संध्याकाळी गर्दीची रेल्वे स्थानके,  शुक्रवारी दुपारी मशिदीच्या ठिकाणी, शनिवारी आणि गुरूवारी साईबाबा आणि शनि मंदिरालगत इत्यादी. पण नियोजन नसल्याने एकाच ठिकाणी पोलीस हवालदार दिवसभर रेंगाळत राहतात. या योजनेनुसार प्रत्येक पोलीस हवालदाराला कामे वाटून देण्यात आलेली आहेत. म्हणजे एक हवालदार सकाळी गर्दीच्या रेल्वे स्थानकात दोन तास, दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी एक तास आणि पुन्हा संध्याकाळी गर्दीच्या स्थानकात दोन तास बंदोबस्त ठेऊ शकतो. अशाप्रकारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना कामे वाटून दिल्याने बंदोबस्ताचे नियोजन साधले जात आहे. मध्य प्रादेशिक विभागात एकूण २० पोलीस ठाणी आहेत. तेथे ३ पोलीस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलीस आयुक्त, ५०० पोलीस अधिकारी आणि ४ हजार पोलीस कर्मचारी असे मनुष्यबळ आहे. या योजनेनुसार सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामे वाटून दिल्याने योग्य ठिकाणी योग्यवेळी मनुष्यबळ वापरून बंदोबस्त देणे शक्य होत आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस दल कार्यरत राहणार असल्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यामुळे ही कॉप स्ट्रेचची योजना अमलात आणल्याचे मधुकर पांडे यांनी सांगितले. ज्याप्रकारे रबराला ताणले जाते त्याच धर्तीवर, आहे त्या मनुष्यबळाचा विस्तारीत आणि उपयुक्त वापर करण्याची ही योजना आहे, असे ते म्हणाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसतो आणि गुन्हेगारांवरही वचक राहतो, असा दावा त्यांनी केला.