News Flash

मराठी लेखकांनी संकुचितपणा सोडावा

भारतीय साहित्य विश्वात मराठी कथासृष्टीच्या निर्माणाला शंभराहून अधिक वर्षे झाली असून त्यात परिवर्तनाचे अनेक प्रवाह आले असले तरी अजूनही मराठी लेखकांची मानसिकता त्यांच्या संकुचित पातळीवर

| July 18, 2014 01:42 am

भारतीय साहित्य विश्वात मराठी कथासृष्टीच्या निर्माणाला शंभराहून अधिक वर्षे झाली असून त्यात परिवर्तनाचे अनेक प्रवाह आले असले तरी अजूनही मराठी लेखकांची मानसिकता त्यांच्या संकुचित पातळीवर आहे. या मानसिकतेमधून लेखकांनी बाहेर येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कथाकार भारत सासणे यांनी केला.
विदर्भ साहित्य संघ आणि चोरघडे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कथाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक वामनराव चोरघडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक कथा भाग १ चा प्रकाशन सोहळा साहित्य संघाच्या संकुलात झाला, त्यावेळी भारत सासणे बोलत होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे, डॉ. श्रीकांत चोरघडे उपस्थित होते.
मराठी कथाविश्वात १९६० नंतर बदल जाणवायला लागल्यावर ६० ते ७० हे दशक नवतेचे म्हणून ओळखले जात आहे. कथालेखकाच्या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागल्याचे या काळात प्रकर्षांने जाणवू लागले. यात प्रस्थापित, ग्रामीण व दलित कथाकारांचे तीन प्रवाह वेगवेगळे वावरत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परंतु मराठी लेखक, त्यांचे लेखन आणि त्यांची प्रत्यक्ष वागणूक या परस्पर आंतरविरोधाभासातून वावरत असल्याचे जाणवायला लागले. एकूणच यामुळे मराठी कथा लेखनाला बधिरावस्था आल्याचे दिसून येते. १९८० ते ९० हे दशक अतिसंवेदनशीलतेचे दिसून येते. यातून कथाकारांच्या शब्दग्रस्त व वेदनाग्रस्ततेला मोडून काढण्याची गरज भासू लागली आहे. १९९०पर्यंत आधुनिक विचारसरणीचा अंत झाला आणि उत्तर आधुनिक विचारसरणीला वेग मिळाला. यातून मराठी कथाविश्वाचा चेहरा बदलत असल्याचे दिसून आले. आता आपल्या कथा विश्वमनाचा शोध असल्याचे प्रतीत होत आहे, तरी अद्याप व्यापक दृष्टीकोन दिसून येत नाही. ज्याप्रमाणे शहादत हसन मंटो यांनी उर्दू कथांना एका उच्चस्थानी नेले तसा कथाकार मराठीला सापडणे अंत्यत गरजेचे असल्याचे सासणे म्हणाले.
प्रकाशनापूर्वी वा.कृ. चोरघडे यांच्या कथाविश्वातील सुनबाई आमि खयाल या दोन कथांचे सभिनय वाचन मीना सासणे आणि ज्येष्ठ नाटय़ कलावंत अजित दिवाडकर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. आभार डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी मानले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2014 1:42 am

Web Title: coragha%e1%b8%8de selected stories published
टॅग : Stories
Next Stories
1 ‘प्रेमाने वागल्यास मुलांमध्ये कायमस्वरूपी बदल’
2 ‘उत्पादनवाढीसाठी नवनवीन प्रयोग करा’
3 गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी मातृसेवा संघाकडे
Just Now!
X