आगरी समाज परिषद या आगरी समाजाच्या संस्थेची स्थापना करून आगरी समाजाला संघटित करणारे आगरी समाज परिषदेचे नेते व परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जी.एल. पाटील यांच्या २७व्या स्मृतिदिनी उरण नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्यांच्या उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्याचे अनावरण शिवसेनेचे माजी मंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते करण्यात आले.
आगरी समाज हा उरण, पनवेल, पेण व अलिबाग या रायगड जिल्ह्य़ातील चार तालुक्यांतील बहुसंख्य समाज आहे. त्याच प्रमाणे ठाणे, नाशिक या दोन जिल्ह्य़ांतसुद्धा समाजाचे मोठे प्रमाण आहे. मुंबईचा आद्य निवासी म्हणून आगरी समाजाची ओळख असली, तरी मुंबईतील आगरीपाडय़ात आता एकही आगरी राहत नाही अशी स्थिती आहे. असे असले तरी आगरी समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी जी.एल. पाटील यांच्या नंतर दिवंगत माजी खासदार दि.बा. पाटील यांनी या समाजाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. या अनावरण समारंभाच्या वेळी भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आगरी समाज परिषदेचे विद्यमान अध्यक्ष श्याम म्हात्रे, ज्येष्ठ नेते नाना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भोईर, उरणचे नगराध्यक्ष नितीन पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, महेश बालदी, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत आदी उपस्थित होते. यावेळी उरण नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात जीएल यांना आदरांजली वाहण्यासाठी सभाही घेण्यात आली. या सभेत सर्वपक्षीय व समाज नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.