राज्यातील रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्तया जानेवारीत करण्यात येतील. दोन टप्प्यात या नियुक्तया केल्या जातील. या विषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. येथील पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
काँग्रेसमध्ये मागासवर्गीयांना स्थान नाही, ही पक्षातील ओरड चुकीची असून पक्षात मागासवर्गीना योग्य स्थान दिले जात असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या विषयी त्यांनी स्वतचे उदाहरण देत आपण कुणबी असून ओबीसींचे प्रतिनिधित्व करतो. राज्यात ओबीसींना पक्षाने प्रदेशाध्यक्ष हे सर्वोच्च पद दिल्याचा दावा त्यांनी केला. येत्या २७ डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेस स्थापना दिनानिमित्त विदर्भातून विशेष रेल्वेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची सोय करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अकोला महापालिका दत्तक घेण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी ठरल्याचे पत्रकारांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी महापालिका लहान असून शासन सवरेतोपरी मदत करत असल्याचे सांगितले. नगरसेवक आणि मुख्यमंत्र्यांशी याविषयी लवकरच एक बैठक आयोजित करून महापालिकेची समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सिंचन श्वेतपत्रिकेवरून त्यांनी सिंचनासाठी आलेला निधी योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, असे मत व्यक्त केले. याविषयी चौकशी समितीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल, असे सुतोवाच त्यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे मुंबईत टिळक भवनात होते. त्यांनी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अकोल्यातील पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस जिल्हा कार्यालय स्वराज्य भवनात ही सोय करण्यात आली होती. यावेळी येथील जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, महेंद्रसिंग सलुजा, हेमंत देशमुख, महानगराध्यक्ष मदन भरगड यांची उपस्थिती होती.    
उपमहापौरांना निमंत्रण नाही
अकोला जिल्ह्य़ात केवळ महापालिकेत उपमहापौर हे काँग्रेसचे पदाधिकारी आहे. काँग्रेसचे उपमहापौर रफिक सिद्दीकी यांना आज येथील महानगर काँग्रेसमधील गटबाजीचा सामना करावा लागला. त्यांना या विशेष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या पत्रकार परिषदेची माहिती देखील देण्यात आली नाही. त्यांना या पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने बोलविण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. इतर आघाडय़ांच्या प्रमुखांना देखील याविषयी माहिती नव्हती व बोलवणेही नव्हते त्यामुळे पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांबद्दल असंतोष होता.