महापालिका हद्दीत सांडपाणी वाहून नेणाऱ्या आणि पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या अशा दोन प्रकारच्या गटारी असून गंगापूर रस्त्यावर ज्या चेंबरमध्ये मजुरांचा मृत्यू होण्याची दुर्घटना घडली ती सांडपाणी वाहून नेणारी गटार असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. उपरोक्त ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. संबंधित मजुरांना गटारीची स्वच्छता करण्यास कोणीही सांगितले नव्हते. असे असताना संबंधित मजूर गटारीत का उतरले, याची स्पष्टता होत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
गंगापूर रस्त्यावरील दुर्घटना पावसाळी गटार योजनेच्या गटारीत घडल्याचा झालेला आरोप पालिका अधिकाऱ्याने खोडून काढला. सांडपाणी वाहून नेणारी गटार जमिनीत अतिशय खोलवर आहे. तुलनेत पावसाळी गटार ही जमिनीपासून आतमध्ये फार अंतरावर नसते. बुधवारी उपरोक्त भागात रस्त्याचे काम सुरू होते. गटारीच्या दुरुस्तीचे काम कोणाला सांगितलेले नव्हते. असे असुनही रस्त्याचे काम करणारे मजूर आतमध्ये उतरले. शहरात नियमितपणे गटारींची स्वच्छता खासगी एजन्सीमार्फत केली जाते. त्यावेळी कुशल मजुरांचा वापर केला जातो.
गटारीची स्वच्छता वा दुरुस्ती अवघड काम असते. अन्य कोणी मजूर ते करु शकत नाही. जेव्हा असे काम केले जाते, तेव्हा संबंधित विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तिथे उपस्थित असतात. गंगापूर रस्त्यावरील काम बांधकाम विभागामार्फत सुरू होते. गटारीची स्वच्छता करण्याचा विषयही नव्हता. ज्यांच्या या कामाशी कोणताही संबंध नाही ते मजूर ढापा उचलून गटारीत का उतरले ही बाब पोलीस तपासात स्पष्ट होईल, असेही संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले.
जवळपास २० वर्षांपासून शहरात गटार दुरुस्ती व स्वच्छतेचे काम केले जात आहे. परंतु, अशी घटना आजपर्यंत घडलेली नव्हती. रस्त्याच्या कामावेळी जमिनीची पातळी समतल करण्याकरिता कधीकधी खालील अंतर्गत व्यवस्थेत बदल करावा लागतो. असे काम बांधकाम व मल:निस्सारण विभाग या दोन्ही विभागांच्या समन्वयाने पार पाडतात, असेही संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.