नालेसफाई व तत्सम मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेने भर पावसाळ्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाला प्राधान्य दिल्याचे पहावयास मिळत आहे. शरणपूर रोड, गंगापूर रोडसह अनेक भागात या स्वरूपाची कामे सुरू असून पावसात तयार होणारे हे रस्ते कितपत तग धरतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळ्याआधी रस्त्यांची शिल्लक राहिलेली काही कामे वगळता इतर रस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, म्हणून डांबराचे आवरण टाकले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असली तरी पालिकेच्या लेखी अद्याप बहुदा पावसाळा सुरू झाला नसावा, अशी स्थिती आहे. वास्तविक, पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण वा तत्सम कामे केली जात नाहीत. जून ते सप्टेंबर या कालावधीत ही कामे पूर्णत: बंद ठेवली जातात. कारण, या हंगामात ही कामे करून कोणताही उपयोग होत नाही. ही बाब ज्ञात असूनही पालिकेकरवी अनेक ठिकाणी डांबरीकरणाची कामे सर्रासपणे सुरू आहेत. शरणपूर रोडवरील राका कॉलनी व गंगापूर रोडवरील काही अंतर्गत रस्त्यांची कामे पालिकेने पावसाळ्यात हाती घेतली आहेत. याबद्दल स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. रस्त्यांची साफ सफाई करून रितसर डांबरीकरणाचे काम सुरू केल्याची माहिती वसुधा फाळके यांनी दिली. वास्तविक, हे काम उन्हाळ्यात होणे आवश्यक आहे. या नव्या रस्त्याची पावसात पूर्णत: वाताहत होईल.
आधी निर्मिलेल्या रस्त्यांची पावसात दुर्दशा होते. असे असताना पालिका पावसाळ्यात ही कामे पुढे का रेटत आहे, असा सवालही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी पहिल्याच पावसात शहरातील अनेक भाग पाण्याखाली बुडाल्याचे स्पष्ट झाले होते. पावसाला सुरूवात होईपर्यत पालिकेने नाले सफाई वा तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरू केले नव्हते. म्हणजे, जी मान्सनपूर्व कामे करणे आवश्यक आहेत, त्याकडे कानाडोळा करत पालिका नव्या रस्त्यांची कामे करण्याची करामत केली आहे. या संदर्भात शहर अभियंता सुनील खुने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी एक-दोन कामे सुरू असल्याचे सांगून उर्वरित ठिकाणी डांबराचे आवरण टाकले जात असल्याचे सांगितले. पावसाळ्यात पाणी रस्त्यात मुरते. असे होऊन रस्त्याचे नुकसान टाळण्यासाठी सध्या त्यावर ही प्रक्रिया केली जात असल्याचा दावा खुने यांनी केला. शहरातील वाहनधारक व नागरिकांची पालिकेला किती काळजी आहे, हे यावरून लक्षात येऊ शकते. रस्त्यात पाणी जिरू नये म्हणून डांबरीकरणाचे आवरण टाकण्यासाठी धडपडणाऱ्या पालिकेने पावसाचे पाणी शहरात साचणार नाही, याबाबत काय दक्षता घेतली हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 9:32 am