पाण्याची
तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल, असे म्हटले जाते. तिसऱ्या महायुद्धाचे माहीत नाही. मात्र मुंबईत सर्वत्र सध्या नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. विविध विभागांमधील या अस्वस्थतेचे समान सूत्र ‘पाणी’ हेच आहे. कुठे भलत्याच वेळेला येणारे पाणी, कुठे अपुऱ्या दाबाने येणारे पाणी तर कुठे नळातून येणारे गढूळ पाणी आणि त्यावर उपाय म्हणून शुद्ध पाण्यासाठी करावा लागणारा हजारो रुपयांचा भरुदड. नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु बहुसंख्य मुंबईकरांना सध्या ही प्राथमिक सुविधाही महापालिका पुरवू शकत नाही. नेहमीप्रमाणेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना त्याचे काहीच सोयरसुतक नाही..
मालाडमधील एका सोसायटीने कूपनलिका खोदताना सरळ पाणीपुरवठय़ाच्या बोगद्यातच हात घातल्याने पालिकेचा अजागळपणा ठसठशीतपणे उघड झाला. कारण हा जलबोगदा जमिनीखालून नेमका कुठून जातो हेच पालिका अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी आंधळेपणाने या सोसायटीला कूपनलिका खोदण्याची परवानगी देऊन अवलक्षण करून घेतले. मात्र आता या जलबोगद्याची दुरुस्ती करण्यासाठी तो सुमारे दोन आठवडे बंदच करून जुन्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने गोरेगाव ते दहिसर या पट्टय़ातील लक्षावधी नागरिक बेहाल झाले आहेत. जुन्या जलवाहिन्यांतून पाणी येत असल्याने ते अशुद्ध, गढूळ येऊ लागले आहे. त्यातच पाण्याचा दाब कमी आहे. परिणामी सोसायटय़ांच्या जमिनीखालील टाक्या भरतच नाहीत. स्वाभाविकच गच्च्यांवरील टाक्याही पुरेशा भरल्या जात नाहीत.
पोईसर झोपडपट्टीत तर पाण्यासाठी रोज संघर्ष सुरू झाला आहे. टँकरची काही निश्चित वेळ नाही. त्यामुळे टँकर आला की झुंबड उडते आणि त्यातून वादविवाद भांडणे सुरू झाली आहेत. बुधवारी रात्री तर आपापसात हाणामारीही झाली. टँकर येणार अशी चाहुल लागली की हातात येईल ती भांडी गोळा करून लोक रांगेसाठी धूम ठोकतात. घरातील चिमरडय़ांसाठीही ते एक काम लागले आहे. त्यातच टँकर कधी येणार हे नेमके माहीत नसल्याने संपूर्ण दिवसभर घरामध्ये कोणीतरी एकजण टँकरकडे डोळे लावून बसलेला असतो. या झोपडपट्टीमध्ये रात्री उशिरापर्यंत टँकरमधून नागरिक पाणी भरत असतात. तसेच पहाटेसुद्धा टँकरवर झुंबड बघायला मिळते.
चाळकऱ्यांची दुर्धर स्थिती
या परिसरातील जुन्या चाळींमध्ये एरवी पालिकेचे पाणी दुसऱ्या मजल्यावरही चढते. जुन्या चाळी असल्याने अन्य इमारतींप्रमाणे जमिनीखाली व गच्चीवर अशी यंत्रणा या चाळींमध्ये नाही. आता पाण्याचा दाब कमी झाल्याने वरच्या मजल्यावर अगदीच करंगळीएवढी धार येते. तर अनेक चाळींमध्ये तेवढेही पाणी येत नाही. त्यातच रोजची पाण्याची वेळही बदलली असून कालावधीही कमी झाला आहे. त्यामुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना भल्या पहाटे उठून बादल्या, हंडे घेऊन तळमजल्यावरील रहिवाशांना उठवून त्यांच्या घरून पाणी भरावे लागत आहे.