24 September 2020

News Flash

शहर साथीच्या आजारांच्या ज्वालामुखीवर, मनपा मात्र सुस्त

शहरात साथीच्या आजाराची, त्यातही डेंग्यूसारख्या जिवघेण्या आजाराची साथ सुरू असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्तच आहे. खासगी जागेत औषध फवारणी करत नाही असे सांगून मनपाचे

| November 24, 2012 03:33 am

शहरात साथीच्या आजाराची, त्यातही डेंग्यूसारख्या जिवघेण्या आजाराची साथ सुरू असूनही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्तच आहे. खासगी जागेत औषध फवारणी करत नाही असे सांगून मनपाचे कर्मचारी अनेक नागरिकांना धुडकावून लावत आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचा बोऱ्या वाजला असून कचरा, पाण्याची डबकी, रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत, तुंबलेल्या नाली, उघडय़ावर वाहत्या गटारी हेच सगळ्या शहराचे चित्र झाले आहे.
शहराच्या मध्यभागाबरोबरच उपनगरांमध्येही डासांचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: सावेडी, नेप्ती, केडगाव अशा उपनगरांमध्ये डासांची संख्या वाढतच चालली आहे. चांगले पोसलेले डास सायंकाळी ६ वाजल्यापासूनच गुणगुणायला सुरूवात करत असतात. चांगल्या जुन्या कचराकुंडय़ा त्यांचा त्रास होतो म्हणून त्याच्या आसपासच्याच लोकांनी तोडूनफोडून टाकल्या. त्यामुळे मोकळा कोनाडा, रस्त्याच्या कडेची जागा दिसली की त्यावर कचरा पडत राहतो. तो नियमितपणे उचलला जात नसल्याने त्याचे ढिग पडलेले दिसतात. त्यातूनही अस्वच्छता वाढते आहे.
सगळे शहर अशा साथीच्या आजाराच्या मुखावर बसलेले असताना त्याचे मनपाच्या आरोग्य विभागाला काहीही सोयरसूतक दिसत नाही. मध्यंतरी महापौर शीला शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यानंतर काही दिवस शहरात ठिकठिकाणी डास प्रतिबंधक औषधांची धूर फवारणी जोरात सुरू होती. एवढा एकच उपाय मनपाकडून सुरू होता, मात्र आता त्यातलाही जोर ओसरला आहे. उपनगरांतील अनेक नागरिक बंगल्याच्या आसपास ही फवारणी करण्याची मागणी करतात. खासगी जागांमध्ये मनपा काम करत नाही, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात येते. हा धूरफवारणीचा उपाय विशेष उपयोगाचा नसताना मनपा मात्र तेवढेच करत असून इतर उपायांकडे मात्र त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
स्वच्छ पाण्याच्या डबक्यांमध्ये या विशिष्ट आजाराच्या डासांची पैदास होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची पाण्याची डबकी नष्ट करण्यासाठी मनपाच्या वतीने मोहीम सुरू करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या कडेने वाढलेले गवत काढणे गरजेचे आहे. कचरा उचलण्याचे वेळापत्रक तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. रोज सकाळी घंटागाडय़ांमधून होणारे कचरा संकलन तर कधीचेच थांबले आहे. त्याचेही नियोजन करण्याची गरज आहे. पूर्वी कचरा काढून घेतला की त्या भोवती औषधी पावडरची वर्तुळे काढली जात. तेही काम मनपाने थांबवल्यात जमा आहे. नाली गटारी साफ ठेवणे, त्या स्वच्छ केल्यानंतर त्यातून निघालेले गाळ रस्त्यावर न ठेवता त्याची लगेचच वासलात लावणे ही कामेही केली जात नाहीत असा नागरिकांचा अनुभव आहे.
राज्यातील अन्य मनपांमध्ये प्रभावीपणे डेंग्यूच्या आजाराचा सामना केला जात आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायांबरोबरच जनजागृतीसाठी प्रचार मोहीम राबवली जात आहे. अनेकांना डासांपासून होणाऱ्या या आजाराचे गांभीर्य नाही. म्हणूनच त्यांना माहिती व्हावी यासाठी नागरिक वैयक्तीक स्वरूपात आपल्या घरात, तसेच आसपास काय करू शकतात, डासांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यायची, तापाची लक्षणे आढळली तर काय करायचे अशी माहिती लोकांमध्ये विविध माध्यमातून प्रसारित केली जात आहे. नगर मनपात त्या आघाडीवर तर स्मशानशांतता आहे. असे काही करायचे असते याचेच भान आरोग्य विभागाला दिसत नाही. डास होऊ नयेत म्हणूनही मनपा काही करत नाही व झाले आहेत तर त्यापासून वाचायचे कसे हेही सांगत नाही, अशी शहरातील स्थिती आहे. त्यामुळेच शहरातील खासगी रुग्णालयात रोज तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.      
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी नगरसेवकांसह आयुक्त विजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेविषयी तक्रार केली. उपनगरांमध्ये आरोग्य विभागाचे काहीही काम होत नसून त्यामुळे डेगींच्या आजाराचे रुग्ण वाढत आहे. प्रतिबंधक उपाययोजना सुरू झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन सुरू करण्याचा इशारा भाजपने आयुक्तांना दिला. सभापती बाबासाहेब वाकळे, गटनेते सचिन पारखी, तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. मुकुंदनगर परिसरातील मुदस्सर शेख, नसीम पठाण, समीर खान, इरफान शेख, अबेज शेख, इम्रान शेख, सचिन दायमा, अरविंद शिंदे, रमेश जोशी आदींनीही आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या कामाबाबत तक्रार केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2012 3:33 am

Web Title: corporation is on slient mode in disease probleme
Next Stories
1 ‘पीएमपी’ च्या बसखरेदीचा तिढा सुटला
2 प्रवेश प्रक्रिया सुरू केलेल्या शाळांवर कारवाई
3 कल्याणी नमकिन कारखान्यातून १२७ गॅसच्या टाक्या जप्त
Just Now!
X