कल्याणमधील लालचौकी ते शिवाजी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात जुन्या चाळी, गाळे पाडून पालिकेच्या परवानग्या न घेता व्यापारी उलाढाल करणारी अनधिकृत बांधकामे उभी करण्यात आली आहेत. ती सर्व बांधकामे महिन्याभरात जमीनदोस्त करण्यात येतील, असे आश्वासन गेल्या महिन्याच्या महासभेत आयुक्त शंकर भिसे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना दिले होते, मात्र तरीही सर्व बांधकामे ‘जैसे थे’ स्थितीत असल्याने भिसे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची दिशाभूल केली असल्याची टीका केली जात आहे.  
पालिकेच्या ‘क’ प्रभागाचे बहुचर्चित प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांच्या आशीर्वादने ही सर्व अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी जुलैच्या महासभेत केली होती. या अनधिकृत बांधकामांमधून मिळणाऱ्या मलईमुळे बोराडे ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी पद सोडून जाण्यास तयार नाहीत, अशीही टीका नगरसेवक करीत आहेत. शिवाजी चौकातील गोपाळकृष्ण हॉटेलमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, लालचौकी ते शिवाजी चौकादरम्यान विविध व्यापाऱ्यांनी दुरुस्तीच्या परवानग्या घेऊन एक ते दोन माळ्यांची उभी केलेली अनधिकृत बांधकामे शहरातील चर्चेचा विषय झाली आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा जुन्या चाळी, घरे होती याठिकाणी आता भव्य संकुले, व्यापाऱ्यांनी दुसऱ्या माळ्यावर दुकाने सुरू केली आहेत. या वाढीव दुकानांचा महसूल पालिकेला मिळत नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
नगरसेवकांच्या टीकेनंतर महापौर कल्याणी पाटील यांनी आयुक्त शंकर भिसे यांना महिनाभरात या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तदर्थ समितीचे अहवाल, गोपाळकृष्ण हॉटेल, रामदेव, गुरुदेव हॉटेलच्या वाढलेल्या शेड, अन्य दुकानांची वाढीव बांधकामे तोडण्याचे आश्वासन आयुक्त भिसे यांनी महासभेत दिले होते.