नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुलाच्या धर्तीवर नवी मुंबई पालिका घणसोली सेक्टर १४ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल उभारणार आहे. मंत्रालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या दालनात मंगळवारी झालेल्या बैठकीत या क्रीडासंकुलावर शिक्कामोर्तब झाले असून या संकुलात ६० हजार प्रेक्षक क्षमता असणारे क्रिकेट स्टेडियमही असणार आहे. ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील हे सर्वात मोठे क्रीडासंकुल असणार आहे.
नवी मुंबईत एखादे भव्य असे क्रीडासंकुल असावे यासाठी पालिका सिडकोकडे गेली अनेक वर्षे जागेची मागणी करीत आहे. नवी मुंबईतील काही खेळाडू राज्य व देश पातळीवर चमकले आहेत. विद्यमान आमदार संदीप नाईक या प्रकल्पासाठी पाठपुरावा करीत होते. त्या नुसार सिडकोने घणसोली सेक्टर १४ येथे ३६ एकरचा भूखंड क्रीडासंकुलासाठी उपलब्ध करून दिला आहे. तो ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरूआहे. मात्र या ३६ एकरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल होणार नाही, असे पालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी सिडकोला कळविले आहे. या भूखंडाच्या शेजारी राज्य शासनाच्या क्रीडा विभागासाठी राखीव ठेवलेला २८ एकरचा व या भूखंडाच्या जवळ असणारा सेक्टर १२ मधील ११ एकरचा असे दोन भूखंड पालिकेला देण्यात यावेत असा प्रस्ताव पालिकेने मुख्य सचिवांना दिला आहे; जेणेकरून एकंदर ७५ एकर जमिनीवर आंतरारष्ट्रीय क्रीडासंकुल उभारता येईल, असे पालिकेने कळविले आहे. त्यासाठी वास्तुविशारद शिवाजी पाटील अ‍ॅन्ड असोसिएटस यांनी या क्रीडासंकुलाचे संकल्पचित्र व आराखडे तयार केले आहेत. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल व पुण्यातील बाणेर येथील क्रीडासंकुलाच्या धर्तीवर हे क्रीडासंकुल राहणार आहे. यात अडीच हजार वाहनांसाठी वाहनतळ, १५ हजार आसनव्यवस्था असणारे वातानुकूलित मैदान, ३०० आसनव्यवस्था असणारे बास्केट बॉल कोर्ट, ५०० आसनव्यवस्थेचे हॉकी स्टेडियम, खो-खो, कबड्डीच्या चार पीच, ७५० आसनक्षमतेचे टेनिस, बॅडमिंटन कोर्ट, यासह स्नूकर, कॅरम या खेळासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय क्रीडासंकुलात प्रशासकीय इमारतीबरोबरच फूड फ्लाझा आणि रेस्टॉरन्टदेखील असतील. ६० हजार प्रेक्षक क्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमसह २५ हजार प्रेक्षकांच्या अ‍ॅथलिटिक्स खेळाचे मैदान या संकुलात बनविण्यात येणार आहे. प्रथम सिडकोने जाहीर केलेल्या ३६ एकर जमिनीचा लवकरच ताबा घेतला जाणार असून जवळच्या दोन जमिनी मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरूअसल्याचे पलिकेच्या योजना विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले.
शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पधार्ंसाठी तयार व्हावेत यासाठी पालिका एकीकडे क्रीडासंकुलाच्या मोठय़ा जमिनीसाठी प्रयत्न करीत असतानाच पालिकेच्या पदरात वाशी सेक्टर १२ येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा तरणतलावाचा २ हजार ९१७ मीटरचा भूखंड पडला आहे. त्याचे ५१ लाख रुपये भरण्यास सिडकोने सांगितले असून पालिकेने आणखी या भूखंडाच्या जवळचा ११३० मीटरचा भूखंड मागितला आहे. त्यामुळे या ठिकाणीही पालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव बनविता येईल असे सांगण्यात आले आहे.