खोदाईसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ
लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या नव्या-कोऱ्या रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी पुन्हा खोदकाम करणाऱ्या वेगवेगळ्या शासकीय तसेच खासगी कंपन्यांना अद्दल घडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने वेगळी शक्कल लढवली असून या खोदकामासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात तब्बल ७० ते ८० टक्क्य़ांनी वाढ करत कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी तंबी या कंपन्यांना देण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेचा अभियंता विभागामार्फत शहरातील रस्त्यांच्या कामावर दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जातो. मुंबई, ठाण्याच्या तुलनेत नवी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा चांगला रहावा यासाठी महापालिकेने मध्यंतरी या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आयआयटी संस्थेतील तज्ज्ञ अभियंत्यांना पाचारण करण्याचा निर्णय घेतला. ठाणे-बेलापूर रस्त्यांच्या कामाच्या काँक्रिटीकरणाच्या दर्जाविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने या कामाचा दर्जा तपासण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांची नेमणूक केली. त्यानंतर शहरातील जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कामावर आयआयटीमार्फत देखरेख केली जाते. एकीकडे रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी महापालिकेचा अभियंता विभाग प्रयत्नशील असताना वेगवेगळ्या शासकीय तसेच खासगी संस्थांकडून वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे महापालिका प्रशासन हैराण झाले आहे. शहरात सिडकोने टाकलेल्या जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिन्या तसेच मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण योग्य प्रकारे झाले नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. अनेक भागांत रस्ते खचल्याने या त्रासात आणखी भर पडली. त्यामुळे केबल टाकण्यासाठी खोदले जाणारे रस्ते अभियंता विभागासाठी नवी डोकेदुखी बनली असून ही कामे करत असताना योग्य नियोजन आखले जात नसल्याने नवे रस्तेही उखडले जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
महापालिकेची
नवी शक्कल
नवी मुंबई महापालिका हद्दीत केबल टाकण्यासाठी महानगर टेलिफोन निगम, महावितरण, महानगर गॅस लिमिटेड, रिलायन्स, व्होडाफोन यासारख्या कंपन्यांकडून वारंवार अर्ज केले जातात. या संस्थांना परवानगी देताना त्यांच्याकडून पुनस्र्थापना शुल्क, पर्यवेक्षण शुल्क तसेच अनामत रकमेची वसुली महापालिकेमार्फत केली जाते. डांबरी रस्ता तसेच पदपथाचे खोदकाम करायचे असेल तर प्रतिचौरस मीटरमागे १९४२ रुपये, खडीकरण केलेल्या रस्त्यांसाठी ९४५ रुपये तर इतर पृष्ठभागाच्या रस्त्यांसाठी १२९ रुपये प्रतिचौरस मीटरचा दर आकारला जातो. अशा प्रकारे काही कोटी रुपयांची मिळकत महापालिकेची होत असते. मात्र वारंवार रस्ते खोदले जात असल्याने हैराण झालेल्या महापालिकेने या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नव्या दरपत्रानुसार डांबरी रस्ता तसेच पदपथांच्या खोदाईसाठी २८०० रुपये, खडीकरण केलेल्या रस्त्यांसाठी १४०० रुपये तर इतर पृष्ठभागांच्या रस्त्यांसाठी ३५० रुपयांचा दर आकारला जाणार आहे. ही वाढ ७० ते ८० टक्क्य़ांच्या घरात असून रस्ते खोदाईसाठी वारंवार अर्ज करणाऱ्या कंपन्यांना हिसका देण्यासाठीही वाढ केली जात आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. यापुढे ठोस नियोजन करून खड्डे खणण्यासाठी अर्ज करावेत, अशी तंबीही या कंपन्यांना देण्यात आली आहे.