महापालिकेच्या वस्तूंची चोरी ही काही विशेष बाब नव्हे. पण आता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात आणि त्यांच्या कक्षात लावलेले सेन्सरच चोरीला गेले आहेत. एम/पूर्व विभागातील सुरक्षा अधिकारी कशाची सुरक्षा करीत आहेत. या चोरीत पालिकेच्याच कोणा अधिकाऱ्याचा तर हात नाही ना, असे प्रश्न या चोरीमुळे निर्माण झाले आहेत.
मागील वर्षी मार्च महिन्यात गोवंडीत नवीन टोलेजंग इमारतीमध्ये महापालिकेचे हे एम/पूर्व विभाग कार्यालय सुरू करण्यात आले. पण एका वर्षांच्या आतच या कार्यालयातील बऱ्याच गोष्टी चोरीला गेल्या आहेत. या कार्यालयात आगीची पूर्वसूचना देणारे २३८ सेन्सर बसविण्यात आले होते. शर्विलकांनी हे सेन्सरच पळविले आहेत.
यातील बरेच सेन्सर दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अख्तर शेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना नीट माहिती देण्यात आली नाही. पण नंतर प्रकरण अंगाशी येते आहे, असे लक्षात आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनीच ८० सेन्सर चोरीला गेल्याची तक्रार देवनार पोलीस ठाण्यात दाखल केली. विशेष म्हणजे सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातील आणि त्यांच्या कक्षातील सेन्सरही चोरीला गेले आहेत. बाजारभावाप्रमाणे एका सेन्सरची किमंत २०६१ रुपये आहे. त्यामुळे सुमारे एक लाख ६५ हजार किमतीचे हे सेन्सर कोणी आणि कुणाच्या मदतीने चोरले, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. पालिकेतील कर्मचाऱ्यांचे काम संपल्यानंतर सर्वच कार्यालयांना कुलूप लावण्यात येत. चोवीस तास सर्वत्र सरक्षा रक्षकही तैनात असतात. असे असताना सेन्सर चोरीला गेलेच कसे? यामध्ये कोण पालिकेतील अधिकारी तर सामील नाहीत ना? आणि चोरीला गेलेल्या सेन्सरची किंमत कोणाकडून वसूल करणार यासंदर्भात सहाय्यक आयुक्त अमित दवे यांना विचारले असता याचा तपास पोलीस करतील. आम्ही नवीन सेन्सर लवकरच बसविणार आहोत, असे उत्तर दिले.