News Flash

लाचप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यास अटक

पालिका बाजारातील गाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या अर्जास मंजुरी मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील साहाय्यक अधीक्षक दशरथ राजाराम भवरला गुरुवारी लाचलुचपत

| September 5, 2014 02:13 am

पालिका बाजारातील गाळा भाडेतत्त्वावर देण्याच्या अर्जास मंजुरी मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील साहाय्यक अधीक्षक दशरथ राजाराम भवरला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्याबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली गेली. प्रारंभी कारवाईची माहिती देण्याबाबत या विभागातील अधिकाऱ्यांनी मौन बाळगले होते.
दोन दिवसांत पालिकेच्या कर्मचाऱ्यास लाच स्वीकारताना पकडण्याची ही दुसरी घटना आहे. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी ७०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापिकेचे प्रकरण ताजे असतानाच दुसरा प्रकार उघड झाल्यामुळे पालिकेत बहुतांश व्यवहार कशा पद्धतीने चालतो, यावर प्रकाश पडला आहे. पंचवटीतील पालिका बाजारातील तीन क्रमांकाचा गाळा भाडेतत्त्वावर मिळविण्यासाठी एकाने अर्ज केला होता; परंतु तो गाळा रिक्त नसल्याने गाळा क्रमांक ११ भाडेतत्त्वावर मिळविण्यासाठी त्यांनी पुन्हा अर्ज केला. या अर्जावरून टिपणी तयार करून वरिष्ठांकडून भाडेतत्त्वाच्या मागणीची मंजुरी मिळवून देण्यासाठी साहाय्यक कार्यालय अधीक्षक दशरथ राजाराम भवर याने २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपयांत हे काम करण्याची तयारी भवरने दर्शविली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानंतर गुरुवारी या विभागाच्या पथकाने सापळा रचला. पालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता ही रक्कम स्वीकारत असताना भवरला रंगेहाथ पकडण्यात आले. एकापाठोपाठ झालेल्या या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणी अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असतील, तर त्याबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2014 2:13 am

Web Title: corporation officer arrested in bribe case
टॅग : Bribe,Bribe Case
Next Stories
1 १७० गणेश मंडळांकडे अधिकृत वीज जोडण्या
2 कांदा आयातीवर बंदी आणण्याची मराठा महासंघाची मागणी
3 ‘व्यक्तीमत्व जडणघडणीत कवितांचा वाटा’
Just Now!
X