पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप प्रतीक्षा असली तरी पावसाळ्यातील आपात्कालीन समस्यांचा सामना करण्यासाठी नागपूर महापालिकेची युद्धपातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर महापालिकेतील विविध विभागांचे ‘बॉस’ आतापासूनच सक्रिय झाले असून संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळीपूर्व योजनांचा आढावा घेण्याची सूचना जारी झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागपूर शहरात पावसाळ्याच्या ऐन भरात जागोजागी पाणी साचणे, नागनदी, नाले, खोलगट भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, दूषित पाण्याचा पुरवठा होणे, झाडे कोसळणे, रस्त्यांवरील उघडय़ा गडर्सवर झाकणे नसणे आदी प्रकारांमुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. याविषयी महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी तातडीची बैठक घेऊन संबंधितांना खबरदारीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. नागपुरात जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस येण्याची अपेक्षा आहे.
उद्या, १ जून ते ३० सप्टेंबर या काळात मान्सून आणीबाणी नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार असून अग्निशमन विभागाच्या बाजूच्या खोलीतील अधिकारी शहराचे नियंत्रण करतील. हा कक्ष २४ तास उघडा राहील आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही तीन पाळ्यांमध्ये २४ तास डय़ूटीवर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. या कक्षावर सर्वसामान्य प्रशासन विभाग आणि नियुक्त अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे नियंत्रण राहील. या कक्षाशी अन्य विभागांना समन्वय ठेवावा लागणार आहे. पाऊस किंवा वादळामुळे झाडे कोसळल्यास उद्यान विभाग आणि अग्निशमन दल संयुक्तपणे कार्यवाही करतील. पाण्याचा संचय होणाऱ्या भागातील पाणी हटविण्यासाठी अग्निशमन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे काम करतील.
विद्युत वाहिन्या, पथदिवे, कोसळलेले विद्युत खांब याच्यासाठी अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाला समन्वय ठेवावा लागेल, घर कोसळण्याची घटना घडल्यास अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, अंमलबजावणी विभाग आणि हॉटमिक्स प्लांट विभाग समन्वय ठेवतील. पूरस्थिती उद्भवल्यास अग्निशमन विभाग मदतीसाठी धावून जाईल. तसेच सर्व वार्ड अधिकाऱ्यांची सर्व यंत्रणा, मशिन्स, उपकरणे सज्ज ठेवण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून रात्रपाळ्यांसाठी आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंत्यांची डय़ूटी लावली जाणार आहे. खोलगट भागातील शाळा-महाविद्यालयांची तसेच प्राचार्याचे दूरध्वनी यांची यादी  तयार ठेवण्यात आली आहे. जर परिस्थिती आणखी गंभीर झाली तर संकटग्रस्त भागातील नागरिकांचे या शाळांमध्ये स्थलांतरण केले जाईल. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच वार्ड अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या निर्देशानुसार अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षात वेळप्रसंगी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आपात्कालीन परिस्थितीत संकटग्रस्त भागातील नागरिकांना अन्न, औषधे, जनरेटर, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा पुरविण्याबरोबरच गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. लाईफ सेव्हिंग जॅकेट, बोटी यांचीही व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असून शहरातील उघडय़ा गडरवर झाकण बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त आर.झेड सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त रवींद्र कुंभारे, अधीक्षक प्रकाश उराडे, उपसंचालक (आरोग्य) डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी सविता मेश्राम, कार्यकारी अभियंता शशिकांत हस्तक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.