रोहन गुच्छेत या मुलाच्या अपहरणासाठी आरोपींनी वापरलेले दुचाकी वाहन पोलिसांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारातील दुचाकी वाहनतळावरून बुधवारी संध्याकाळी जप्त केले. हे वाहन कोणाचे, त्याचा मालक कोण याचा शोध आम्ही घेत आहोत, अशी माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.
रोहनचे त्याच्या घराजवळून अपहरण करून चौघांनी त्यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात हाती लागलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलीस आणखी तपास करत आहेत. चार आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर रोहनच्या अपहरणासाठी वापरलेले वाहन महापालिकेच्या आवारात दुचाकी वाहनतळावर उभे करून ठेवले होते, अशी कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींना घटनास्थळी आणून पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. रोहनच्या अपहरणाचा डाव यशस्वी झाल्यानंतर कोणाला कसलाही संशय येऊ नये म्हणून ही दुचाकी पालिकेच्या आवारात आरोपींनी आणून उभी केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या आवारात दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. हे लक्षात आल्यानेच मारेकऱ्यांनी दुचाकी महापालिकेच्या आवारात आणून उभी केली असण्याचा संशय पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यापुढे पालिकेच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक वाहन, त्याचा चालक यांची चौकशी करून मगच प्रत्येक वाहन चालकाला महापालिका आवारात सोडण्याच्या सूचना प्रभारी आयुक्तांनी दिल्या असल्याचे बोलले जाते.