केंद्रीय गृह मंत्रालयाने वर्षभरापूर्वी आदेश देऊनही पालिकेला अद्याप राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासाठी (एनडीआरएफ) मुंबईत जागा देता आलेली नाही. गेल्या वर्षी मंत्रालयाला लागलेली आग, यंदाच्या पहिल्याच पावसाने उडालेली दैना आणि उत्तराखंडातील भीषण संकटामुळे या पथकाची गरज अधोरेखित होताच, या पथकासाठी जागा शोधण्याकरिता आता पालिकेने धावपळ सुरू केली आहे.
पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्य सुरू करता यावे यासाठी सर्व महानगरांमध्ये आपत्ती निवारण पथकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश देशांतील सर्व महापालिकांना केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिले होते. मात्र मुंबईत ‘एमडीआरएफ’ला जागा उपलब्ध करून देणे एक वर्षांनंतरही महापालिका प्रशासनास शक्य झालेले नाही.  
पुण्याजवळील तळेगाव येथे एनडीआरएफचा तळ आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये आपत्कालीन मदतकार्यासाठी एनडीआरएफला तेथूनच धावतपळत घटनास्थळी पोहोचावे लागते. मंत्रालयाला आग लागली तेव्हा एनडीआरएफला तळेगाव येथून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत मुंबई गाठावी लागली होती. मंत्रालयाला लागलेली आग आणि पहिल्याच पावसात मुंबईत उडालेली दाणादाण या बाबी लक्षात घेऊन एनडीआरएफसाठी भांडूप कॉम्लेक्स येथील जागेचा विचार पालिका करीत होती. परंतु तेथे पाणीपुरवठा प्रकल्प सुरू असल्याने या जागेचा विचार मागे पडला. आता मानखुर्द अथवा बोरिवली येथील जागांची पाहणी करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या वरिष्ठ मंडळींना या जागा दाखविण्यात आल्या असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
मुंबई शहराचे आकारमान आणि रचना लक्षात घेता मध्यवर्ती ठिकाणी एनडीआरएफला जागा देणे गरजेचे आहे. शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये सहजगत्या पोहोचता येईल अशी जागा एनडीआरएफला देणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम उपनगरातील टोकाला असलेल्या बोरिवली व पूर्व उपनगरातील मानखुर्द येथील जागांचा विचार पालिका करीत आहे, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.