नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिडकोनिर्मित वाशी येथील बी टाईप इमारतीच्या एका घराचा स्लॅब कोसळून दाम्पत्य जखमी झाले होते. शुक्रवारी झालेल्या महासभेत हा प्रश्न चांगलाचा पेटला. नगरसेवकांनी एकमताने या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधित सिडको आणि राज्य नगरविकास विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर सागर नाईक यांनी कायदेशीर बाबी तपासून आयुक्तांना संबंधित विभागांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई शहारात ४० वर्षांपूर्वी सिडकोने इमारती वसवल्या आहेत. वाशी, कोपरखरणे, नेरुळ आदी ठिकाणी सिडकोने इमारती उभारल्या आहेत.  मागील काही वर्षांपासून सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून अनेकजण जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या संदर्भात माजी उपमहापौर भरत नखाते आणि नगरसेवक किशोर पाटकर यांनी सिडकोनिर्मित घराची वस्तुस्थिती मांडली. राज्य शासनाकडे आणि सिडकोकडे अनेकदा पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय घेण्यात आला नसल्याने वाशी येथील जे-१ जे २ इमारतीतील नागरिकांवर मागील १४ वर्षांपासून संक्रमण शिबिरामध्ये राहणाची वेळ आली असल्याची खंत पाटकर यांनी दिली. यावेळी सर्व नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या सिडको आणि नगरविकास खात्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली. महापौर सागर नाईक यांनी सिडकोने बांधलेल्या इमारतीपैकी धोकादायक इमारतीचा आढावा घेण्याचे प्रशासनाला सूचित केले, तर भविष्यात एखादी घटना घडल्यास त्याला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी सिडको आणि नगरविकास खात्याविरोधात कायदेशीर बाबी तपासून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘लोकसत्ता’चा अंक महासभेत झळकला
 सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्यानंतर लोकसत्ताचा अंक झळकवण्यात आला. महामुंबई वृत्तान्तच्या धोकादायक इमारतींचे शहर या वृत्ताच्या माध्यमातून शहरातील धोकादायक इमारतींच्या वास्तवतेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. याला गांभीर्याने घेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका महासभेत घेतली होती.

४० वर्षांपासून सिडकोच्या धोकादायक इमारतीतील रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. सिडकोला मात्र याची जरादेखील खंत नाही. पालिका आयुक्तांकडे सदस्य आणि महापौर सागर नाईक यांनी या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची केलेली मागणी योग्य आहे.
अनंत सुतार, सभागृह नेते